येत्या काही दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यातच आता सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या दौऱ्यांचे आणि बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात शिवसेना आणि भाजपाने युती केली होती. तसेच आगामी विधानसभा निवडणुकांमध्येही दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना आपण युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार असल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. तसेच त्यांना सरकारचा भाग म्हणून पहायला आवडेल, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कोणतीही अडचण नाही. आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य ठरतील. तसेच त्यांना सरकारमध्ये पहायलाही आवडेल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यावर भाष्य केलं. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपा एकत्र लढणार आहेत. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी आमच्या जुन्या मित्रपक्षांना बाजूला काढण्याची आमची संस्कृती नाही. राज्यात शिवेसना भाजपा समान जागांवर निवडणूक लढतील. प्रत्येकी 130 ते 140 जागांवर आम्ही लढणार असून उर्वरित जागा आमच्या मित्रपक्षांसाठी सोडण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 2014 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा वेगवेगळे लढले होते. त्यावेळी भाजपाने 144 जागा लढवल्या होत्या आणि त्यापैकी 122 जागांवर विजय मिळाला होता. आता आम्ही अर्ध्या अर्ध्या जागा लढवणार असून काही जागा मित्रपक्षांसाठीही सोडणार आहोत. यावेळी किती जागांवर विजय मिळेल याचा आकडा सांगता येणार नसला तरी तो नक्कीच विक्रमी असेल आणि याचा आम्हाला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी भाजपामध्ये सुरू असलेल्या पक्षप्रवेशाबद्दलही भाष्य केलं. या पक्षप्रवेशांना ‘महाभरती’ असं म्हणणार नाही. परंतु आता आम्ही हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे. असं असलं तरी काही अति महत्त्वाच्या व्यक्तींना त्यांची पार्श्वभूमी तपासून, तसेच त्यांचं काम आणि लोकप्रियता पाहून भाजपामध्ये प्रवेश देऊ शकतो. येत्या काही दिवसांमध्ये अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करतील, असा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, यावेळी त्यांनी विरोधकांवरही हल्लाबोल केला. विरोधकांना जनता का नाकारत आहे, याचा विचार त्यांनी केला पाहिजे, असे ते म्हणाले. जे लोक आमच्याकडे येत आहेत, त्यांचा आमच्यावर विश्वास आहे. आगामी निवडणुका आम्ही केवळ विकासाच्याच मुद्द्यावर लढवणार आहोत. गेल्या पाच वर्षांमध्ये राज्यात झालेला विकास हा जनतेला दिसत आहे. तसेच आम्ही जनतेला उत्तम सरकार देण्याचा प्रयत्न करत असल्याचे माहित आहे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी त्यांनी राज्यात सुरू असलेल्या विकासप्रकल्पांवरही भाष्य केलं. बुलेट ट्रेन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे दोन्ही महत्त्वाचे प्रकल्प आहेत. बुलेट ट्रेनमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असून मोठ्या प्रमाणात नोकऱ्याही उपलब्ध होणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी केवळ 0.5 टक्के व्याजाने जपानने आपल्याला 1 लाख कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे. तसेच ते आपले ट्रेन भारतात तयार करण्यासाठी आपले तंत्रज्ञानही देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.