संघर्ष यात्रेच्या माध्यमातून सरकारविरोधी वातावरण तापवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरु असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यात्रेवरुन विरोधकांना टोला लगावला आहे. संघर्ष नाव ठेवून संघर्ष यात्रा होत नाही असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरणनिर्मिती करण्याकरिता काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल (से), समाजवादी पार्टी, पीपल्स रिपब्लिकन कवाडे, एमआयएम या सर्व विरोधकांनी चंद्रपूर ते पनवेल अशी संघर्षयात्रा आयोजित केली आहे. आज पनवेलमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. चंद्रपूरमध्ये यात्रेला सुरुवात करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते लक्झरी एसी बसमधून गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संघर्ष यात्रेत नेत्यांचा शाही प्रवास सुरु असल्याची चर्चा सुरु होती. हा मुद्दा हेरत देवेंद्र फडणवीस यांनीदेखील विरोधकांवर टीकास्त्र सोडले. संघर्ष नाव ठेवून संघर्ष यात्रा होत नाही. संघर्ष यात्रेत विरोधक लक्झरी बस आणि कारमधून रस्त्यावर उतरत नाही असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, विरोधकांच्या संघर्ष यात्रेचे मंगळवारी पुण्यात आगमन झाले. सत्तेत आल्यापासून या सरकारने उद्योगपतींची कर्जे माफ केली. मात्र हेच सरकार शेतकऱ्यांची कर्जे माफ करण्यास तयार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. बाजार समिती येथील निसर्ग मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. तीन वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. त्या रोखण्यासाठी हे सरकार कोणत्याही उपाययोजना करताना दिसत नाही असा आरोपही तटकरेंनी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 4, 2017 2:27 pm