मुख्यमंत्र्यांचा विश्वास; १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेची राज्यभर सुरुवात

कल्याण : वृक्ष लागवड हा शासनाचा कागदावरचा कार्यक्रम राहिला नसून, या उपक्रमाला जनआंदोलनाचे व्यापक स्वरूप आले आहे. वृक्ष लागवडीच्या या जनआंदोलनातून हरित महाराष्ट्राचे स्वप्न येत्या काळात पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कल्याण तालुक्यातील वरप येथे वृक्षारोपणाने या मोहिमेची सुरुवात झाली. या कार्यक्रमाद्वारे राज्यात १३ कोटी वृक्ष लागवडीची सुरुवात करण्यात आली.

राज्याचा ३३ टक्के भूभाग वनांनी आच्छादण्यासाठी ४०० कोटी वृक्ष लागवडीची आवश्यकता आहे. येत्या चार वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा टप्पा पूर्ण केला जाईल. पुढील वर्षी २५ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. लागवड केलेल्या प्रत्येक रोपाचे वन

विभागाकडून जिओ टॅगिंग केले जात आहे. त्यामुळे झाडे पूर्वीच्याच खड्डय़ांमध्ये लावण्यासारख्या प्रकारांना आळा बसेल. अशा टप्प्याने वृक्ष लागवड करून हरित महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीची संकल्पना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम मांडली. सुरुवातीला या मोहिमेत अडीच कोटीहून अधिक वृक्षांची लागवड झाली. त्यापुढील टप्प्यात पाच कोटी वृक्षांची लागवड झाली. आता १३ कोटीहून अधिक वृक्ष लागवडीचा निर्धार करण्यात आला आहे. जनताही या उपक्रमात सहभागी होऊ लागली आहे.  वृक्षारोपण हा कार्यक्रम नाही तर सृष्टीला वाचविण्याचा,  जंगल, जमिनीला वाचविण्याचा उपक्रम आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

ठाण्यात पाच लाखांपेक्षा जास्त वृक्षांची लागवड

ठाणे: वृक्ष लागवडीच्या मोहिमेत पहिल्या दिवशी ठाणे वनवृत्तात वनविभागातर्फे ५ लाख ३२ हजार १८१ वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवडीत ठाणे वनविभागाकडे ६४ लाखांपेक्षा जास्त रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट असल्याने ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या जागेत ही वृक्ष लागवड करण्यात आली. या वृक्ष लागवडीच्या मोहिमेत नऊ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवला.