ठाणे  : ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे राज्य पुरोगामी विचारांवर पुढे चालले आहे. त्यामुळे त्यांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवावे लागले तर त्यासाठी माझी तयारी असेल’’, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी ठाण्यातील रिपाइं (आठवले गटा)च्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले.

‘‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या नेत्यांचे पुतळे काँग्रेसने देशभर उभारले तर काही नेत्यांनी त्यांच्या वडीलांचेही पुतळे उभारले. परंतु, ज्या नेत्याने देशाची राज्यघटना लिहिली, त्या नेत्याचा मात्र त्यांना विसर पडला’’, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘‘गीता, बायबल, कुराणपेक्षा राज्यघटना आम्हाला प्रिय आहे. या राज्यघटनेमुळे आमचे अस्तित्व आहे आणि वंचितांना न्याय मिळतो आहे. देशाची राजकीय व्यवस्था आणि ओळखही या राज्यघटनेमुळेच आहे. बाबासाहेबांचे स्मारक मतांसाठी नव्हे तर मानवंदनेसाठी उभारण्यात येत आहे’’, असे त्यांनी सांगितले. शिवसेना आमच्यासोबत आली नाही तरी रिपाइं मात्र भाजपसोबतच राहील, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

गुन्हे मागे घेणार

भिमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी दाखल झालेले गुन्हे मागे घेणार असून त्यामुळे एकाही व्यक्तीवर गुन्हा राहणार नाही. कायदेशीर प्रक्रियेसाठी वेळ लागतो आहे. मात्र, दिलेला शब्द पाळेन, असे फडणवीस म्हणाले.