भाजपने केलेल्या सर्वेक्षणातून ३९ आमदारांचे राजकीय भवितव्य धोक्यात असल्याचे समोर आले आहे. याशिवाय जवळपास निम्म्या खासदारांची कामगिरीदेखील फारशी समाधानकारक नसल्याची आकडेवारी भाजपच्या सर्वेक्षणातून पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना तंबी देत कामगिरी सुधारण्याचा इशारा दिला. कामगिरी सुधारा, अन्यथा फळे भोगा, अशी तंबीच मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

भाजपने पक्षाच्या आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. पक्षाच्या १२२ पैकी ३९ आमदारांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. याशिवाय २३ पैकी ११ खासदारांनादेखील चांगले काम करण्यात अपयश आल्याचे सर्वेक्षण अहवाल सांगतो. याच सर्वेक्षणाचा आधार घेत मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय आमदारांना चांगलेच फैलावर घेतले. ‘३९ आमदार आणि ११ खासदारांच्या उमेदवारीला मोठा विरोध होणार आहे. त्यामुळे या आमदार, खासदारांना प्रचंड मेहनत घेत कामगिरीत सुधारणा करावी लागेल,’ असा सल्लाही त्यांनी दिला.

‘भ्रष्टाचारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकारने उत्तरदायी असायला हवे. जनतेला उत्तरदायी असलेले प्रशासन चालवणे ही माझी जबाबदारी आहे,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आमदारांना खडसावले. ‘स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियुक्त्या आणि बदल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. आमदार आणि खासदारांना कामगिरी सुधारावी लागेल. अन्यथा परिस्थिती अवघड होईल आणि खराब कामगिरीचे फळ भोगावे लागेल,’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींची कानउघाडणी केली.

भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी मागील महिन्यात मुंबईला भेट दिली होती. शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बैठक घेतली. शहा यांनी लोकसभेसाठी देशात ३५०, तर विधानसभेत २०० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी डोळ्यासमोर ठेवून बूथ स्तरावर समिती स्थापन करावी, असे आदेश शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना दिले आहेत.