विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी विदर्भ व मराठवाडय़ातील दुष्काळी स्थितीच्या आढावा दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारची रात्र गरीब शेतकऱ्याच्या घरी काढल्यानंतर बुधवारी सकाळी माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या ल्याहरी (तालुका हदगाव) येथील फार्म हाऊसवर न्याहारी घेतली.
यवतमाळचा दौरा आटोपून मुख्यमंत्र्यांनी वसमतमार्गे परभणीला जाण्याचे नियोजन केले होते. मंगळवारी सायंकाळपर्यंत त्यांचा हदगाव तालुक्याचा दौरा निश्चित नव्हताच. त्यांच्याशी संपर्क साधून तशी खात्री करून घेतल्यावर तेथील शिवसेना आमदार नागेश पाटील आष्टीकर मध्यरात्री औरंगाबाद व तेथून मुंबईला रवाना झाले. या दरम्यान मुख्यमंत्र्यांना आपल्या गावी आणण्यासाठी वानखेडे यांचा पाठपुरावा सुरूच होता आणि त्यात ते यशस्वी ठरले.
यवतमाळजवळील पिंपरी बुटी गावातून सकाळी निघालेले मुख्यमंत्री थेट हदगावला आले. मात्र, पुढे वसमत-परभणीला वेळेवर पोहोचता यावे, यासाठी त्यांनी विश्रामगृह व तेथील सोपस्कार टाळून थेट ल्याहरी गावात प्रवेश केला. तेथे जलयुक्त शिवार अभियानातील शेततळ्याच्या कामाच्या भूमिपूजनाची तयारी आधीच झाली होती. तो उपचार पूर्ण केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या वेळी उपस्थित शेतकऱ्यांसमोर आटोपशीर भाषण केले. नंतर मुख्यमंत्री फडणवीस हे वानखेडे यांच्या फार्म हाऊसवर गेले. फडणवीस यांच्या स्वागतासाठी नांदेडहून गेलेले माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, तसेच चैतन्यबापू देशमुख आदी हजर होते. या सर्वासोबत मुख्यमंत्र्यांनी न्याहारी घेतली. तेथे आलेल्या शेतकऱ्यांच्या निवेदनांचा स्वीकार करून सर्वाशी त्यांनी संवाद साधला.