एकीकडे मुख्यमंत्र्यांचे समाधान शिबीर आणि त्याच वेळी दुसरीकडे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बोलविलेली आढावा बैठक यामुळे  राजकीय वर्तुळात चर्चेला ऊत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समाधान शिबिराला शह देण्यासाठीच आढावा बैठक घेण्यात आल्याची चर्चा आहे.
सामान्य नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मतदारसंघात शनिवारी समाधान शिबीर घेतले. संपूर्ण सरकारी यंत्रणा या शिबिरात व्यस्त होती. दुसरीकडे याच वेळी गडकरी यांच्या उपस्थितीत रविभवनात दक्षता सनियंत्रण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर गोसेखुर्द, मिहानसह इतरही प्रकल्पांचा आढावा घेण्यात येणार होता. एकीकडे मुख्यमंत्र्यांचे शिबीर, तर दुसरीकडे केंद्रीय मंत्र्यांची बैठक एकाच दिवशी आल्याने अधिकाऱ्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली.
रविभवनात गडकरी यांच्या उपस्थितीत दक्षता सनियंत्रण समितीची बैठक सुरू झाली तेव्हा सुरुवातीला एकही आमदार हजर नव्हते. ते सर्व समाधान शिबिरात होते. आमदारांची अनुपस्थिती लक्षात आल्यावर त्यांना निरोप पाठविण्यात आले. तोपर्यंत समाधान शिबिराचा उद्घाटन समारंभ आटोपलेला होता. तेथून सर्व आमदार रविभवनात दाखल झाले. त्यांच्याच पाठोपाठ सर्व वरिष्ठ अधिकारीही पोहोचले. त्यानंतर आढावा बैठकांचे सत्र सुरू झाले.
नागरिकांच्या समस्या आणि विकासाचे प्रश्न या दोन मुद्यांवर फडणवीस आणि गडकरी यांनी एकत्रित बैठक घेणे अपेक्षित होते. कारण, अनेक मुद्दे राज्य शासनाशी संबंधित होते. समाधान शिबिरात गडकरी गेले खरे, पण मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वीच ते तेथून निघून आले. दुसरीकडे नागपूरमध्ये असूनही मुख्यमंत्री आढावा बैठकीत आले नाही. त्यामुळेही चर्चेला ऊत आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या समाधान शिबिराला शह देण्यासाठीच आढावा बैठक घेण्यात आल्याची चर्चा आहे.