तामिळनाडूतील जलीकट्टूचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता राज्यात बैलगाडा शर्यतींना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. तामिळनाडू जलीकट्टूसाठी राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर आता राज्य सरकारदेखील बैलगाडा शर्यतीसाठी अध्यादेश काढू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दलचे आश्वासन दिले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यामध्ये जलीकट्टूप्रमाणेच बैलगाडा शर्यतीसाठी अध्यादेश काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींच्या मागणीसाठी मुख्यमंत्री असल्याचे दिसून आले. ‘बैलगाडा शर्यत सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू असून सध्या आचारसंहिता असल्याने निर्णय घेता येत नाही. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर याप्रकरणी अध्यादेश काढू,’ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी बैलगाडा संघटनांच्या प्रतिनिधींना दिले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ही माहिती दिली.

बैलगाडा शर्यतीला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडूनदेखील करण्यात आली होती. या संदर्भात शिवसेनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली होती.

बैलगाडा शर्यतीदरम्यान बैलांनाअ अतिशय निर्दयीपणे वागवण्यात येत असल्याने २०११ मध्ये अध्यादेश काढून प्राण्यांच्या शर्यतीवर बंदी घातली गेली होती. त्यामुळे बैलगाडा शर्यतींवरही बंदी आली. हा वाद पुढे न्यायालयात गेल्यावर निकाल बैलगाडा मालकांच्या विरोधात लागला. उच्च न्यायालयाने दिलेला निकाल सर्वोच्च न्यायालयानेही कायम ठेवला.

मध्यंतरीच्या काळात केंद्रात सत्ताबदल झाल्यावर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घेतली होती. राज्यातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी मागे घ्यावी, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रकाश जावडेकरांकडे केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी कायम ठेवली होती.