राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे अभ्यासू नेते आहेत. मात्र, त्यांना त्यांचे सल्लागार चुकीची माहिती देतात व त्या आधारावर ते बोलतात, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
मेट्रो रेल्वेच्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारचे फक्त शहरी भागाकडे लक्ष असून ग्रामीण भाग दुर्लक्षित राहिला आहे, अशी टीका शरद पवार यांनी त्यांच्या मराठवाडा दौऱ्यात केली होती.  राज्य सरकारचे शेतीकडेही लक्ष नाही,त्यामुळे लवकरच आपण मुख्यमंत्र्यांकडे लवकरच एक शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत,  असे ते म्हणाले होते. याकडे फडणवीस यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शरद पवार अभ्यासू नेते आहेत. ते कधीही चुकीचे बोलू शकत नाही.
मात्र, त्यांचे सल्लागार त्यांना चुकीची माहिती देत असून त्या आधारावर ते बोलत आहेत. मुळत सध्या राज्यात ६ हजार गावात जलसंधारणाची ७० हजार कामे सुरू आहेत.
‘अनाठायी टीका’
आघाडी सरकारने १५ वर्षांत जी कामे केली नाहीत ती राज्य सरकार एका वर्षांत करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे पवार यांची टीका अनाठायी आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.