जन्मभूमीच्या वादाचे नंतर पाहू, आधी पाथरीचा विकास करून घ्या

परभणी : साई जन्मभूमीच्या वादाबाबत खल करत बसण्यापेक्षा मंजूर शंभर कोटी रुपयांमध्ये पाथरीचा विकास करा, असे सांगतानाच पाथरीच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. या वेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विशाल कदम आदी उपस्थित होते. मंगळवारी पाथरी येथे महाआरतीनंतर साईबाबांची जन्मभूमी पाथरीच असल्याबाबतचा ठराव ग्रामसभेने एकमुखाने घेतला होता. जन्मभूमीबाबत सत्य शोधण्यासाठी शासनाने समिती नेमावी. त्या समितीवर आमचा विश्वास असेल असे जिल्ह्यतील सर्व लोकप्रतिनिधींनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज मुख्यमंत्र्यांची जिल्ह्यतील लोकप्रतिनिधींची बठक होईल असे अपेक्षित होते. मात्र, आज मुंबईत खासदार जाधव व आमदार वरपूडकर हे दोघेच होते. आमदार बाबाजानी दुर्रानी एका न्यायालयीन कामकाजानिमित्त गंगाखेड येथे होते, तर आमदार राहुल पाटीलही परभणी शहरातच होते. मुंबईत खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी पाथरीसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. जन्मस्थानासंबंधीच्या वादाबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतीही टिपणी केली नाही. अथवा जन्मभूमीबाबत कोणतेही भाष्य केले नाही. मात्र आधी पाथरीचा विकास करून घ्या असे ते म्हणाल्याचे वरपूडकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. मंत्रिमंडळ बठकीतही पाथरीच्या विकास आराखडय़ाबाबत चर्चा झाल्याचे वरपूडकर यांनी सांगितले. दरम्यान खासदार जाधव, आमदार वरपूडकर यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाल्यानंतर आता पुन्हा जिल्ह्यतील लोकप्रतिनिधींची मुख्यमंत्र्यांसोबत वेगळी बठक होण्याची शक्यता मावळली आहे.

साईबाबांच्या जन्मभूमीबाबत सत्य शोधण्यासाठी एक समिती नेमण्यात यावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली मात्र जन्मभूमीवरून वादाचा खल करीत बसण्यापेक्षा आधी मंजूर आराखडय़ानुसार विकास कामांना सुरुवात करा, निधी पदरात पाडून सर्वागीण विकास करा, त्यासाठी अभ्यास समितीचा अडसर नको. समिती नेमल्यानंतर ती तिचे काम करीत राहील त्यामुळे विकास आराखडय़ाची अंमलबजावणी खोळंबू नये, असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्यांनी पाथरीच्या विकास आराखडय़ाबाबत अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे.  – संजय जाधव, खासदार