काँग्रेसच्या ‘चाय की चर्चा’ची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असून दाभडीला आता ‘अच्छे दिन’ ची पुन्हा आस वाटू लागली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाभडी येथील विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करून पाठविण्याचा संदेश दाभडी ग्रामपंचायतीला दिला आहे. सरपंच संतोष टाके व सदस्य प्रकाश राऊत यांनी ग्रामसभा घेऊन दाभडीच्या विकासासंदर्भात सुमारे शंभर ठराव पारित करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे तडकाफडकी पाठवले आहेत. हा काँग्रेसच्या ‘चाय की चर्चा’ चा असरच म्हणावा लागेल, अशी चर्चा सध्या तरी आर्णी तालुक्यात सुरू आहे. २० मार्च २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी ‘चाय पे चर्चा’ हा कार्यक्रम घेऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून ‘जर मी सत्तेत आलो तर या समस्या तात्काळ निकालात काढेन’, असे भरीव आश्वासन दिले होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊन १० महिन्यांचा कार्यकाळ झाला असला तरी शेतकऱ्यांच्या समस्या किंवा दाभडीचा विकास या संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे २० मार्च २०१५ रोजी युवक काँग्रेसच्या माध्यमातून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी पुढाकार घेऊन नरेंद्र मोदी यांना आठवण करून देण्यासाठी ‘चाय की चर्चा’ हा कार्यक्रम घेतला होता. त्यात मोदी यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती झाली नाही म्हणून ‘काळी चाय’ देत निषेध नोंदविला होता. त्यानंतर लगेच शासन स्तरावरून चक्रे फिरायला सुरुवात झाली व मुख्यमंत्र्यांचा संदेश दाभडीपर्यंत येऊन पोहोचला.
दाभडीला काय हवे हे ग्रामसभेचा ठराव घेऊन पाठवा, निधीची तरतूद करण्यात येईल, असे सांगण्यात आले. नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी मागील आठवडय़ात महाराष्ट्र शासनाने दाभडी या गावाला दत्तक घेतल्याचे आर्णी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले होते. त्यामुळे कदाचित हा त्यामधील एक भाग असू शकतो.
जो आराखडा मुख्यमंत्र्यांकडून मागविण्यात आला त्यात शेतकरी समस्या, अंतर्गत रस्ते, पांदण रस्ते, बँक, नळ योजना, आरोग्य केंद्र, शिक्षण इत्यादी विषयांचा समावेश असून त्यात ५० कोटीच्या जवळपास निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुन्हा दाभडीवासीयांना व या भागातील शेतकऱ्यांना विकासासंदर्भात ‘अच्छे दिन’ची अपेक्षा पुन्हा बळावली आहे.