सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. भाजपाने आक्रमक भूमिका घेत महाविकासआघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एवढंच नाही तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही, इशारा देखील दिला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेकडून पावलं उचचली जात असुन, संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, याबाबत अद्याप कुणाकडूनही अधिकृतपणे माहिती देण्यात आलेली नाही.

…अन्यथा अर्थसंकल्पीय कामकाज होऊ देणार नाही – चंद्रकांत पाटील

दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपा महिला मोर्चाच्यावतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. भाजपाने राज्य सरकारला धारेवर धरले असुन, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून सरकारला आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरण्याची पूर्ण तयारी केली आहे.

“उद्धवजींना मी इशारा देतो, की जर…”, पूजा चव्हाण प्रकरणी चंद्रकांत पाटलांचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान!

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जाहीर आव्हान दिलं आहे. “सोमवारपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सोमवारच्या आत जर राज्य सरकारने संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही, त्यांची चौकशी सुरू केली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी यावर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवदन करावं, नाहीतर आम्ही या मुद्द्यावर तोंड न उघडणाऱ्या राज्य सरकारला अधिवेशनात तोंड उघडू देणार नाही, सभागृह चालू देणार नाही”, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी  दिला आहे.