जागावाटपाची चर्चा नवी दिल्लीतच होईल, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या हेतूबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शंका उपस्थित केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीत सध्या दिल्ली की मुंबई वाद सुरू झाला आहे. मात्र या वादापासून पद्धतशीरपणे दूर राहात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना योग्य तो ‘संदेश’ दिला आहे.
काँग्रेसबरोबर आघाडी कायम ठेवताना जागावाटपाची चर्चा आता दिल्लीतच होईल, असे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि नेते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले. २००४ आणि २००९ मध्ये जागावाटपाची प्रारंभिक चर्चा मुंबईत झाली होती. आताही मतदारसंघांच्या आदलाबदलीची प्राथमिक चर्चा मुंबईत व्हावी. अंतिम स्वरूप दिल्लीत देता येईल, अशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांची भूमिका आहे. मुंबईत चर्चा करण्याची टाळाटाळ का करता, असा सवाल करीत ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर स्वार्थीपणाचा ठपका ठेवला. राज्य काँग्रेसमध्ये सध्या मुख्यमंत्री विरुद्ध प्रदेशाध्यक्ष असे शीतयुद्ध सुरू आहे. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशीही मुख्यमंत्र्यांचे फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. या पाश्र्वभूमीवर जागावाटपावरून प्रदेशाध्यक्षांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी मुख्यमंत्र्यांनी यापासून चार हात लांब राहण्यावर भर दिला आहे.
बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसलाही राष्ट्रवादीची तेवढीच गरज आहे. निवडणुकीच्या तोंडावर उभयतांनी वाद वाढवू नयेत, अशी राष्ट्रवादीची अपेक्षा आहे. त्यातच शरद पवार आणि मुख्यमंत्री चव्हाण यांची जवळीक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या आहे. पवार आणि मुख्यमंत्र्यांची वाढलेली जवळीक ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी तेवढीच तापदायक ठरू शकते, असा राष्ट्रवादीत एक मतप्रवाह आहे. हे सारे कंगोरे लक्षात घेता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र मौन बाळगळेच पसंत केले आहे.

माणिकरावांचा असाही विक्रम
राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावना मांडणारे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राज्य काँग्रेसमध्ये वेगळाच विक्रम केला आहे. १९९०च्या दशकात साडेसहा वर्षे प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. प्रदेशाध्यक्षाच्या कारकिर्दीस अलीकडेच पाच वर्षे त्यांनी पूर्ण केली. आतापर्यंत प्रदेश काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ प्रदेशाध्यक्षपद भूषविण्याचा मान ठाकरे यांना मिळाला आहे.