राज्यातील सिंचन घोटाळय़ावर कारवाई करण्याऐवजी घोटाळेबाज मंडळींनी पाठीशी घालण्याचे कुकर्म राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करत असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पत्रकार बैठकीत केला.
फडणवीस म्हणाले, चितळे समितीने आपल्या कार्यकक्षेत बसून सिंचन घोटाळय़ासंबंधी अतिशय स्पष्ट मत सात प्रकारच्या वर्गवारीच्या माध्यमातून मांडले आहे. सत्तेच्या बळावर राज्य सरकारने सिंचन घोटाळा दाबण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाकडे १४ हजार पानांचा पुरावा आम्ही सादर केला. कॅगने दिलेल्या अहवालात ४६ हजार कोटी रुपयांच्या किमती वाढवण्यात आल्याचे म्हटले आहे. मंत्री आणि ठेकेदारांच्या संगनमताने कागदावरच पसे खर्च झाल्याचे दाखवण्यात आले आहे. तत्कालीन मंत्री अजित पवार हे या घोटाळय़ात व्यक्तिश: अडकलेले आहेत. त्यांच्या पदाचा स्पष्ट उल्लेख असूनही राज्य शासन मात्र केवळ अधिकाऱ्यांनाच दोषी धरत मंत्र्यांना पाठीशी घालते आहे. स्वच्छ प्रतिमा असल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवण्यास हवे होते. तेही सरकार वाचवण्यासाठी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत असल्यामुळे आम्ही आता न्यायालयीन लढा देणार आहोत. जनतेच्या न्यायालयात आम्हाला विधानसभा निवडणुकीत नक्की न्याय मिळेल, असे ते म्हणाले. याप्रसंगी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार सुनील गायकवाड, गणेश हाके, गोिवद केंद्रे, नागनाथ निडवदे, संभाजी पाटील निलंगेकर, पाशा पटेल उपस्थित होते.
पारिजात मंगल कार्यालयात स्व. गोपीनाथ मुंडे यांचा अस्थिकलश ठेवण्यात आला होता. त्याप्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी दर्शन घेतले.