पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना तसंच क्रीडा स्पर्धांना परवानगी देण्यात येणार नाही, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. आज त्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात अनेक जत्रा, उत्सवांचं आयोजन रद्द करण्यात आलं. तसंच सर्वांनी ते करावं, असंही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, यापुढे पुढील सूचना येईपर्यंत कोणत्याही क्रीडा स्पर्धा असतील किंवा कोणतेही राजकीय कार्यक्रम असतील त्यांनाही परवानग्या देण्यात येणार नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला पुन्हा एकदा गर्दी टाळण्याचं आवाहन केलं. आपल्याकडे रोज मार्केट उघडी असतानाही गर्दी का होते, असा सवाल त्यांनी यावेळी केला. अनेक ठिकाणी अशा गोष्टींवर मर्यादा आहेत. पण आपण जास्तीत जास्त वेळ बाजार उघडा ठेवतो आहोत. बाजारात गेलात तरी सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले. अनेकांना घरात राहून मानसिक अस्वस्थता जाणवत असेल याची मला कल्पना आहे. आज आपल्याला बाहेर पडण्याची ओढ आहे. पण ज्यांना शक्य असेल त्यांनी घरून काम करा. याच गोष्टी आपल्याला संकटातून बाहेर नेतील, असंही त्यांनी नमूद केलं.

.. तर गय करणार नाही
खोटे आणि उगाचच अफवा पसरवणारे दोन समाजांमध्ये दुहीचा व्हायरस पसरवणारे व्हिडीओ कुणी गंमत म्हणूनही पसरवत असेल तर त्यापैकी कुणाचीही गय केली जाणार नाही. नोटांना थुंकी लावण्याचा व्हिडीओ किंवा इतर त्यासारखे व्हिडीओ पसरवले जात आहेत. ज्यामुळे दोन समजांमध्ये तेढ निर्माण होते. असं गंमत म्हणूनही कुणी करत असेल तरीही त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.

आणखी वाचा- दुहीचा व्हायरस पसरवणाऱ्यांना सोडणार नाही- मुख्यमंत्री

..होय रुग्ण वाढत आहेत
महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे. जगभर धुमाकूळ या व्हायरसने घातला आहे. या केसेसमध्ये आपण रुग्ण चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ही संख्या वाढते आहे. काळजी करु नका कारण ५१ लोकांना घरी पाठवण्यात आलं आहे हेदेखील लक्षात घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा- ….म्हणून उद्धव ठाकरेंनी भाषणात केला सोलापूरच्या सात वर्षांच्या आराध्याचा उल्लेख

अनेकांचा पुढाकार
सगळेजण जात-पात-धर्म-पंथ विसरुन करोनाशी लढा देण्यासाठी एकत्र आले आहेत. अनेक संस्था जेवणाचं वाटप करत आहेत. अनेक हॉटेल्सनी मदतीचा पुढाकार घेतला आहे. सिंहाचा नाही तर खारीचा वाटा सगळेजण उचलत आहेत. मी या सगळ्यांना धन्यवाद देतो आहे. धन्यवाद, विनंती हे सगळे शब्द संयम पाळणाऱ्या सगळ्यांसाठी आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेशी संवाद साधला.

आणखी वाचा- कोरोना जात, धर्म पाहत नाही, त्यामुळे…. – उद्धव ठाकरे

दिल्लीतून आलेले तबलिगी सापडले
दिल्लीतून आलेल्या तबलिगिंची आपल्याला केंद्राकडून यादी मिळाली होती. त्याप्रमाणे आपण त्या सर्वांचा शोध घेतला आहे. त्यांना सध्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. याव्यतिरिक्तही कोणी असेल तर त्यांनी पुढे यावं किंवा लोकांनी त्यांची माहिती द्यावी, असंही त्यांनी नमूद केलं.