“ज्यांनी सैन्यातील आरोग्य विभागात काम केलं आहे किंवा जे डॉक्टर्स, परिचारिका किंवा वॉर्डबॉय निवृत्त झाले आहेत त्यांनी आमच्यासाठी संपर्क साधावा आणि या युद्धात साथ द्यावी, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आज (बुधवार) त्यांनी राज्याच्या जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ज्यांनी सैन्य दलातील आरोग्य विभागात काम केलं आहे. तसंच जे डॉक्टर्स, परिचारिका, वॉर्डबॉय हे निवृत्त झाले आहेत किंवा ज्यांनी याबाबत शिक्षण घेतलं आहे आणि ज्यांना काम मिळालं नाही, त्यांनी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ज्यांना या युद्धात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी Covidyoddha@gmail.com या ईमेल आयडीवर नाव, नंबर, संपर्काचा पत्ता यासह संपर्क साधावा, असंही ते म्हणाले.

आणखी वाचा- करोनाच्या मागे आपण ‘हात धुवून लागलो आहोत’ संकट संपणारच: उद्धव ठाकरे

याव्यतिरिक्त महाराष्ट्रात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना बाधितांवर चांगले आणि प्रभावी उपचार करता यावेत यासाठी महत्वाची घोषणा केली आहे. करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी चार भागांमध्ये आरोग्य सेवेची विभागणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा- करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

तीन प्रकारची रूग्णालयं
ज्यांना सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे असतील त्यांनी खासगी दवाखान्यात न जाता क्युअर क्लिनिकमध्ये जावे. प्रत्येक विभागात ही क्लिनिक असतील. त्याची माहिती देण्यात येईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच ज्यांच्यामध्ये करोनाची सौम्य लक्षणे असतील त्यांच्यासाठी एक वेगळं रुग्णालय असेल. तर ज्यांना मध्यम प्रमाणात करोनाची लक्षणे असलेल्यांसाठी दुसरे हॉस्पिटल असेल आणि ज्यांच्यामध्ये करोनाची अतीतीव्र लक्षणे आहेत तसेच उच्च रक्तदाब, मधुमेह किडनी असे अन्य आजारही आहेत, त्यांच्यासाठी तिसरं रुग्णालय असेल. हे रुग्णालय अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.