जगभरात आलेलं अभूतपूर्व असं करोनाचं संकट ही सध्या सरकारसमोर सगळ्यात मोठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. मग ते राज्यातलं सरकार असो किंवा देशात असो. मात्र, या काळात देखील राजकीय पक्ष मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण करताना दिसत आहे. राजकीय पक्षांच्या या भूमिकेवर शिवसेना पक्षाध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परखड आणि सविस्तर भूमिका मांडली आहे. तसेच, यावेळी त्यांनी देशातल्या सर्वच राजकीय पक्षांना इशारा देखील दिला आहे. ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी देशासमोर आणि राज्यासमोर उभं ठाकलेलं करोनाचं संकट आणि त्याचा सामना करणारे राजकीय पक्ष याविषयी आपलं मत व्यक्त केलं.

मला धाकधूक याची वाटतेय की….

“पक्षीय राजकारणापेक्षा आत्ता लोकांसाठी जगावं कसं असा प्रश्न आहे. करaनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. करोना अजून किती काळ चालेल हे माहिती नाही. त्यामुळे प्रत्येकाला आपलं आयुष्य ही प्राथमिकता आहे. जर मला सत्ता कशासाठी पाहिजे हा विचार माझ्यासमोर स्पष्ट नसेल, तर मला सत्ता देणारी लोकं माझ्याविरोधात जातील. मला धाकधूक अशी वाटते, कुठलाही राजकीय पक्ष असो, त्याने फक्त सत्तालोलुप होऊन, मिळवायचीच आहे म्हणून वाट्टेल त्या मार्गाने सत्ता मिळवली आणि जर जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही, तर आपला देश अराजकतेकडे चाललेला आहे. ही माझी भिती आहे”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“तुमचे राजकारणाचे धंदे बस झाले!”

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी जनता कशी विरोधात जाऊ शकते, हे देखील सांगितलं. “लोकं पक्ष वगैरे काहीही मानणार नाहीत. तुम्हाला मी मत दिलं होतं. तुम्ही मला या गोष्टी सांगितल्या होत्या. त्या तुम्ही मला द्या. माझ्या मुलाचं शिक्षण होत नाहीये. मला नोकरी मिळत नाहीये. माझं घर कसं चालवायचं हे सांगा. तुमचे राजकारणाचे धंदे बस्स झाले. ते तुमचे तुमच्याकडे ठेवा. तुम्ही कुणाबरोबर युती करताय वगैरे आघाडी-बिघाडी तुम्ही बघा. मला काय हवंय त्यासाठी मी तुम्हाला मत दिलंय, तुम्हाला काय हवंय यासाठी मी तुम्हाला मत नाही दिलंय”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“जेव्हा प्रमोद महाजन म्हणायचे, शहाणा झालायस का?”, उद्धव ठाकरे यांनी जागवल्या रम्य आठवणी…

करोना ही धोक्याची घंटा!

“माझ्या मते करोना ही धोक्याची घंटा आहे. ती सगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या डोक्यात वाजली पाहिजे. ती न वाजता आपण याही काळात राजकारण करत बसलो, एकमेकांवर आरोप करत बसलो आणि लोकांकडे दुर्लक्ष केलं, तर मात्र देशात अराजक येईल”, असं ते म्हणाले.

“बाळासाहेबांना त्या गुन्ह्याची किंमत नंतर भोगावी लागली”, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका!

लोकांचे जीव चाललेत, आणि तुम्हाला खुर्च्या दिसतायत?

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर देखील निशाणा साधला. “जनतेचा विचार करा, अर्थव्यवस्था कशी मजबूत होईल, त्याचा विचार करू. हा काळ ओसरल्यानंतर आहेच ना राजकारण. सरकार पाडापाडीचे धंदे कुठे सुरू असतील तर थांबा ना थोडं. लोकांचे जीव चालले आहेत आणि तुम्हाला खुर्च्या दिसतायत. लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. खुर्ची देणारे जगले नाहीत, तर तुमच्या खुर्च्यांवर बसून तुम्ही करणार काय?आत्ता कृपा करून राजकारण थांबवा”, असं ते म्हणाले

“…तर माझ्यासारखा करंटा दुसरा कुणी नाही”

“या परिस्थितीतून देशाला सावरण्यासाठी सगळे पक्ष एकत्र यायला काय हरकत आहे? पहिला देश महत्त्वाचा आहे. देश जगला तर आपण जगू. देश चांगला राहिला तर निवडणुका होतील आणि त्यानंतर तुमची जी काही स्वप्न पूर्ण करायची असतील ती करा. फक्त निवडणुकीत युती आणि आघाडी म्हणजे सहाय्य नाहीये. निवडणुकीसाठी एकत्र नका येऊ, देशासाठी एकत्र या. मी जर देशाचा विचार न करता माझ्या खुर्चीचा विचार करणार असेल, तर माझ्यासारखा करंटा आणि नालायक दुसरा कुणी नाही”, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.