सध्या राज्यात जे टीमवर्क आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. आपण सगळेजण एकसंध कसे राहात आहोत हे पाहिलं जातं आहे. आपल्याकडे रुग्णांची वाढ होते आहे ही बाब चिंतेची आहे. करोना आपल्या मागे लागला आहे. मात्र करोनाच्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत. घरी बसून सगळ्यांना कंटाळा आला आहे. पण सध्या आपल्याकडे काहीही इलाज नाही. घरात राहूनही आपली जनता तणावमुक्त कशी राहिल हे वृत्तवाहिन्यांनी पहावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राशी संवाद साधला.

मास्क छत्रीसारखे वापरु नका

जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मास्क अत्यंत दक्षतेने वापरा. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका असंही त्यांनी ते स्पष्ट केलं.

Fever Clinics सुरु केली जाणार

राज्यभरात फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. राज्याच्या प्रत्येक विभागात ही क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत. त्यामुळे चार प्रकारामध्ये ही फिव्हर क्लिनिक्स सुरु केली जाणार आहेत त्यामध्ये डॉक्टर्स असतील असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. विलगीकरण, अलगीकर हे जसं आहे तसं हे वेगळीकरण आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.

विषाणूचा गुणाकाराचा काळ

महाराष्ट्रात आत्तापर्यंत २१ हजार जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. २२०० लोकांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं आहे. १५ ते १७ हजार चाचण्या आत्तापर्यंत झाल्या आहेत. ज्यांची लक्षणं सौम्य आहेत असे ६१० आहे. ११० असे आहेत ज्यांना लक्षणं आहेत. त्यापैकी २२ गंभीर आहेत. मृत्यू झालेल्यांची संख्या ६४ आहे. विषाणूचा हा गुणाकाराचा काळ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत चिंतेच वातावरण आहे मान्य आहे. मात्र मुंबईत आणि पुण्यात चाचण्या वाढवल्या आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.