राज्यात करोनाच्या रुग्णसंख्येत घट झालेली असताना टप्प्याटप्प्याने निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या पार्श्वभूमीवर ५ टप्प्यांमध्ये राज्यात अनलॉक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आणि अनेक गावांमध्ये देखील करोनाची संख्या बऱ्याच अंशी कमी झाल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जी गावं करोनामुक्त झाली आहेत, अशा गावांमध्ये दहावी-बारावीचे वर्ग सुरू करता येतील का? याविषयी चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज शिक्षण विभागाला दिले. या गावांमध्ये यापुढे देखील करोनासंदर्भातले सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जाईल, याची खात्री दिली जाऊ शकते का? याविषयी देखील आढावा घेण्यास सांगण्यात आले आहे.

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाची बैठक पार पडली. यावेळी ग्रामीण भागात करोनाचं प्रमाण नियंत्रणात आल्याच्या मुद्द्यावर दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नियमित वर्गांचा विषय चर्चेला आला. जी गावे मागील काही महिन्यांपासून करोनामुक्त आहेत आणि भविष्यातही गाव करोनामुक्त ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे कडक पालन करत गाव करोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावांमधील १० वी तसेच १२ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. यावेळी यासंदर्भात चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!

दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

दरम्यान, करोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचा पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याबाबतची योजना शालेय शिक्षण विभागामार्फत प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी लागणाऱ्या निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

आता शाळा सोडल्याचा दाखला नसला, तरी दुसऱ्या शाळेत मिळणार प्रवेश! शिक्षण विभागाचा निर्णय

मूल्यांकनासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश

बारावीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या १२ वीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने इयत्ता १० वीसाठी मुल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली त्याचा तुलनात्मक अभ्यास करून १२ वीच्या विद्यार्थ्यांचे गुण मूल्यांकन करण्याबाबतचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.