मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून असतात, ते घराबाहेर पडत नाहीत अशी टीका माझ्यावर विरोधक करत आहेत. मात्र त्यांना हे कळत नाही की तुम्ही जिथे जाऊ शकलेला नाहीत तिथे मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाऊन आलो आहे. तिथल्या लोकांशी मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला आहे. तुम्ही ज्या दुर्गम भागांमध्ये जाऊ शकलेला नाहीत त्या ठिकाणी मी जाऊन आलोय. तिथल्या लोकांशी संवाद साधला आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मी तिथे जाऊन आलो आहे. असं म्हणत विरोधकांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. करोनाचं संकटच नाही तर इतर वादळंही येऊन गेली. राजकीय वादळं सोडून द्या त्या वादळांना मी घाबरत नाही. त्या वादळांना मी तुमच्या साथीने सामोरा जातो आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

जिथे विरोधक पोहचू शकलेले नाहीत तिथे मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून जाऊन आलोय. त्यामुळे मी घराबाहेर पडत नाही ही टीका करणाऱ्यांनी हे थोडं लक्षात घ्यावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोनाच्या संकटाला आपण सामना देतो आहोत. अशात आपण अनलॉकही सुरु केलं आहे. हळूहळू सगळ्या गोष्टी आपण सुरु करतो आहोत. भेटायचं असेल तर बंद जागेत भेटणं टाळा. एसीचा वापर करण्यापेक्षा हवा खेळती राहू द्या. अडचणीच्या जागी, अपुऱ्या जागी थांबू नका असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

करोविरोधातल्या लढाईत प्रत्येकाचा वाटा हवा

करोना विरोधातल्या लढाईत महाराष्ट्रातल्या जनतेचा सहभाग हवा आहे. हळूहळू आपण अनेक गोष्टी सुरु करतो आहोत. मात्र मोहिमेत मला तुमच्या सगळ्यांचा सहभाग हवा आहे. रामसेतू बांधतना जसा खारीचाही वाटा होता अगदी तेवढा वाटा उचला तरीही चालेल. खारीचा वाटा किंवा सिंहाचा वाटा उचला पण या मोहिमेत सहभागी व्हा असंही आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.