झारखंडमधले २८ कामगार लॉकडाउनमुळे कल्याणमध्ये अडकले आहेत. शहाबुद्दीन अन्सारी यांनी यासंदर्भात ट्विट केलं होतं. ज्या ट्विटला उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांना मी यासंदर्भातली कल्पना दिली आहे. ते लवकरच तुम्हाला संपर्क करतील आणि योग्य ती मदत करतील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?
झारखंड येथील २८ कामगार महाराष्ट्रातील कल्याणमध्ये अडकून पडले आहेत. उल्हासनगर आणि कल्याण येथील भागात हे कामगार अडकले आहेत. गोड्डा येथील सगळे रहिवासी आहेत. या सगळ्यांकडे खाण्यापिण्यासाठीही पैसे नाहीत. तसंच राहण्यासाठी निवाराही नाही. त्यामुळे या लोकांना मदत करा असं आवाहन शहाबुद्दीन अन्सारी यांनी ट्विट करुन केलं.

या आवाहनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लवकरच या सगळ्यांना मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अख्खा देश १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आला आहे. तर महाराष्ट्र आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी आणि लॉकडाउनमुळेच हे कामगार अडकले आहेत. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.