News Flash

उद्धव ठाकरे-राज्यपाल कोश्यारी वादात कंगनाची उडी, म्हणाली…

मंदिरं खुली करण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल-ठाकरे सरकार यांच्यात मतभेद

राज्यातील मंदिर खुली करण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरत असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिर खुली करण्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून काही सवाल उपस्थित केले. लॉकडाउन शिथिल केला जात असताना आणि एकीकडे बार, रेस्टॉरंट खुली करत असताना देवीदेवतांना मात्र अजूनही कुलूपबंद का ठेवलं जात आहे? असा सवाल राज्यपाल कोश्यारी यांनी केला. त्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारेच राज्यपालांना उत्तर दिलं. करोनाचा धोका लक्षात घेता मंदिरं उघडणं अद्याप शक्य होत नसून यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन त्यांनी याद्वारे दिलं. या पत्रांमुळे ठाकरे सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्या वाद पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पण याचदरम्यान, अभिनेत्री कंगना राणौत हिने या वादात उडी घेतली.

राज्यपाल कोश्यारी यांनी पत्रात उद्धव ठाकरे यांना त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेची आठवण करून दिली होती. तर हिंदुत्वासाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं होतं. यात कंगनानेही एक ट्विट केलं. “हे पाहून आनंद झाला की ‘गुंडा सरकार’ला राज्यपाल प्रश्न विचारत आहेत. राज्यपाल महोदय, गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी दिली आहे, पण मंदिरं मात्र योजनाबद्ध पद्धतीने बंद करून ठेवली जात आहेत. ही सोनिया सेना तर बाबरसेनेपेक्षाही वाइट वर्तणुक करताना दिसते आहे”, असं ट्विट अभिनेत्री कंगना राणौतने केलं.

काय होतं राज्यपाल कोश्यारी यांच्या पत्रात?

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंदिरं खुली करण्याच्या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १२ ऑक्टोबरला पत्र पाठवलं. यात राज्यपालांनी एकीकडे सरकार बार, रेस्टॉरंट खुले करत आहे, तर देवीदेवतांना मात्र अजूनही लॉकडाउनमध्येच का ठेवलं आहे? असा सवाल केला. मागील तीन महिन्याच्या काळात अनेक शिष्टमंडळांनी या संदर्भात माझी भेट घेतली आहे. तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहात. तुम्ही हे सार्वजनिकरित्या मान्यही करता. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केलीत. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनांची अमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी, असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.

उद्धव ठाकरेंचे उत्तर-

जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जिवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. करोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात आहे. माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचं हसत-खेळत स्वागत करणं हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही. प्रार्थनास्थळं उघडण्याबाबतच्या आपल्या विनंतीचा सरकार नक्की विचार करेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2020 5:51 pm

Web Title: cm uddhav thackeray governor bhagat singh koshyari letter spat kangana ranaut tweet gunda government sonia sena babur sena vjb 91
Next Stories
1 मोठी बातमी! नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या
2 “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्या उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी”
3 मुख्यमंत्र्यांचा राज्यपालांना ‘यॉर्कर’; म्हणाले, “ती तिनही पत्रं भाजपा पदाधिकाऱ्यांची”
Just Now!
X