लसीकरण अॅपवर नोंदणीपासून लसीची पहिली मात्रा घेईपर्यंत सध्या संपूर्ण देशात गोंधळाचं चित्र आहे. अनेकदा नोंदणी होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यात नोंदणी झाली तर वेळ आणि दिवसाचा स्लॉट मिळण्यास अडचणी आहेत. करोना लसीकरणासाठी तयार करण्यात अॅपमुळे सध्या लसीकरण केंद्रावर गोंधळाचं वातावरण निर्माण होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी नवं अॅप तयार करण्याची परवानगी मागितली आहे. कोविन अॅपमध्ये अनेक त्रुटी असल्याचं त्यांनी पत्रात लिहीलं आहे.

देशात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांच लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी कोविन अॅपवर नोंदणी करणं आवश्यक आहे. मात्र लसींचा अपुरा पुरवठा आणि कोविन अॅप हाताळताना येणाऱ्या अडचणींमुळे नागरिक वैतागले आहेत. अनेक ठिकाणी नोंदणी असूनही लस नसल्याने माघारी परतावं लागत आहे. काही ठिकाणी सर्वर डाऊन असल्यामुळेही गोंधळ उडाला आहे.

‘नागरिकांचा जीव जातोय…’; काँग्रेस नेते राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

लस न घेताही लस मिळाल्याचा मॅसेज येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गोंधळ टाळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केलेल्यांनाच लस मिळेल यासाठी ४ अंकी सुरक्षा कोड आणला आहे. आजपासून हा ४ अंकी सुरक्षा कोड लागू झाला आहे. लसीकरणाच्या स्लॉटसाठी ऑनलाईन बुकिंग केलेल्या नागरिकांनाच हे नवे फिचर लागू होईल.

“पवारांना मजूर दिसले नाहीत, पण बारचालकांचं वीजबिल दिसलं”, आचार्य तुषार भोसलेंची टीका

देशात अवघ्या २४ तासांत कालावधीत चार हजारांहून अधिक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही देशातील एका दिवसातील आतापर्यंतची उच्चांकी नोंद असून, २४ तासांत चार लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशात दररोज साडेपाच हजार मृत्यू होतील असा भीती वजा इशारा अमेरिकेतील इन्स्टिट्यूटने काही दिवसांपूर्वी दिला होता. हा इशारा खरा ठरतोय की, काय अशी शंका गेल्या २४ तासांतील आकडेवारीवरून डोकं वर काढताना दिसत आहे. देशात करोनाचं थैमान सुरू असून, करोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं वाढत चालला आहे.