“अनेकजण इतर प्रांतातून महाराष्ट्रात येतात रोजी रोटी कमावतात, नाव कमवतात काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात काहीजण मानत नाहीत” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौतला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्या प्रकरणावर कंगनाने सातत्याने भाष्य केलं. सुशांत हा बॉलिवूडच्या कंपूशाहीचा आणि गटबाजीचा बळी आहे असाही आरोप तिने केला. अशात काही दिवसांपूर्वीच कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली. ज्यानंतर मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांनी तिच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला. दरम्यान तिच्या या वक्तव्यावरुन संजय राऊतही चांगलेच संतापले. शिवसेनेच्या इतर नेत्यांनीही तिच्या या वक्तव्याचा निषेध नोंदवला. संजय राऊत आणि कंगना यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं. मात्र या सगळ्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी काहीही भाष्य केलं नव्हतं. आज मात्र त्यांनी अप्रत्यक्षरित्या कंगनाला टोला लगावला आहे.

आणखी वाचा- “मुंबईचा अपमान करणाऱ्या कंगनाला केंद्राने वाय दर्जाची सुरक्षा देणं धक्कादायक”

करोनाच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन भरवण्यात आलं. या अधिवेशनात महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री अनिल राठौड यांच्या निधनाचा शोक प्रस्तव मांडण्यात आला. त्यावेळी अनिल राठौड यांना आदरांजली वाहताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कंगनाला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.

आणखी वाचा- देवेंद्र फडणवीस म्हणाले, कंगनाशी सहमत नाहीये, पण…

आणखी वाचा- “कंगनाला महाराष्ट्राचे गृहमंत्री धमकावत आहेत, हे खपवून घेतलं जाणार नाही”

काय म्हणाले मुख्यमंत्री?
अनेकजण इतर प्रांतातून मुंबईत, महाराष्ट्रात येतात. रोजी रोटी कमावतात, नाव कमावतात. काही जण महाराष्ट्राचं ऋण मानतात काहीजण मानत नाहीत. अनिल राठौड राजस्थानहून इथे आले होते. मुंबई, मंचर, त्यानंतर नगरला गेले. सर्वसामान्यांसाठी त्यांनी त्यांचं काम सुरु केलं. शिवसेना प्रमुखांच्या हिंदुत्त्वाच्या विचाराने अनिल राठौड प्रेरित झाले होते. खूप चांगलं काम त्यांनी शिवसेनेत केलं.