गुरुवारी पुण्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी सूचक विधान केलं होतं. “मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसांत तुम्हाला कळेल”, असं ते म्हणाल होते. या विधानाची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. भाजपा पुन्हा सत्तास्थापनेच्या हालचाली करत असल्याचा देखील अंदाज वर्तवला जाऊ लागला असताना आता त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असून सर्व कार्यक्रमांनंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरून टोला लगावला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या विधानाविषयी विचारणा केली असता उद्धव ठाकरेंनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “मी असं ऐकलंय की ते आमच्या तीन पक्षांपैकी एका पक्षात येण्याचा प्रयत्न करत आहेत”. चंद्रकांत पाटील यांच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमादरम्यान केलेल्या विधानाचा अर्थ काढला जात होता. त्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“येणारा काळच काय ते ठरवेल”

मुख्यमंत्र्यांनी इमारत उद्घाटन कार्यक्रमात बोलताना व्यासपीठावर उपस्थित असलेले रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे पाहून “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख केला. त्यामुळे शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यात कालच चंद्रकांत पाटील यांनी “दोन दिवसांत कळेल”, असं विधान केल्यामुळे या चर्चेला अधिकच हवा मिळाली. त्यावर बोलताना पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, “माझा अर्थ तोच आहे. उद्या सगळे एकत्र आले तर भावी सहकारीही होऊ शकतात. येणारा काळच काय ते ठरवेल”. त्यामुळे कोणतीही शक्यता उद्धव ठाकरेंनी फेटाळून लावलेली नाही.

आजी, माजी आणि भावी…! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण!

रावसाहेब दानवे म्हणतात, “तिथे फार काही आलबेल नाही”

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आजी-माजी आणि भावी सहकारी विधानावर भाजपा खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील सूचक प्रतिक्रिया दिली आहे.  “याचा अर्थ असा असेल, की तिथे फार काही आलबेल चाललेलं नाही. मला मुख्यमंत्री म्हणाले की काँग्रेस-राष्ट्रवादीचे लोक जर मला त्रास द्यायला लागले, तर मी भाजपाला बोलवून घेतो. हे मला उद्धव ठाकरे आज म्हणाले. या एकदा, आपण बसून बोलू. बाळासाहेब थोरातांच्या समोर ते म्हणाले की काँग्रेसवाले जर त्रास द्यायला लागले, तर मी तुमच्यासारख्यांना बोलवेन. ते कधी मैत्रीत बोलतात, कधी भाषणात या गोष्टी चालत असतात”, असं दानवे म्हणाले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडताना दिसत आहे.