महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाबाधितांची एकूण संख्या मोजण्याच्या पद्धतीवर ‘मार्मिक’पणे टीप्पणी केली आहे. राज्यातील करोनाबाधितांच्या संख्येसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला असता उद्धव ठाकरेंनी सध्या मोजण्यात येणाऱ्या रुग्णसंख्येमध्ये राज्यात पहिल्यांदा बरा होऊन घरी गेलेल्या रुग्णालाही मोजण्यात येतं असं म्हटलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी हा आक्षेप घेतला.

“देशभरामध्ये करोनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत आहे. देशातील संख्या १० लाखांच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रातील संख्या तीन लाख आहे,” असं प्रश्न विचारताना संजय राऊत म्हणाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना मध्येच थांबवले. राज्यातील एकूण आकडा हा तीन लाख असल्याचे मुख्यमंत्र्यांनी राऊत यांच्या निदर्शनास आणून दिले. “राज्यातील एकूण आकडा हा तीन लाख आहे, म्हणजे जो पहिला रुग्ण बरा होऊन घरी गेला आहे त्याला सुद्धा त्यामध्ये पकडलं जात आहे. जे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत त्यांना एकूण आकड्यामध्ये धरता कामा नये. तुम्हाला तुमच्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री किंवा देशाला पंतप्रधान किती असं विचारल्यावर  नेहरुंपासून पंतप्रधान धरणार का किंवा महाराष्ट्रात यशवंतरावांपासून मुख्यमंत्री धरणार का? असे सगळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान एकत्र धरत नाहीत. आता किती पंतप्रधान एक, आता किती मुख्यमंत्री तर एक. कोण कोण होऊन गेलं तर हे हे होऊन गेले असं सांगतो आपण,” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी करोनाची रुग्णसंख्या मोजण्यासंदर्भातील आपला आक्षेप नोंदवला. यामधून मुख्यमंत्र्यांना जे रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत त्यांना करोना रुग्णांच्या संख्येत मोजले जाऊ नये असं सांगायचं होतं.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंनी सांगितलं करोना काळामध्ये मंत्रालयात न जाण्याचं कारण, म्हणाले…

रुग्ण संख्या नाही तर हे आहे मोठं आव्हान…

“काही ठिकाणी आकडा वाढतोय. एक मुद्दा आपण लक्षात घ्यायला हवा की ही साथ आहे. आकडा वाढतोय, तो थोडा वाढणार. लवकारात लवकर रुग्ण ओळखून त्याला उपचार देणे आणि मृत्यूदर कमी ठेवणं हे आपलं उद्दीष्ट आहे. औषध नसताना सुद्धा जे उपलब्ध आहे त्यामधून इलाज करुन मृत्यूचं प्रमाण कमी करणं हे आता आपल्यासमोरील मोठं आव्हान आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “ग्रामीण भागांमध्ये पावसाळ्यात करोना केंद्र सुरु करायची असतील तर…”

“…त्या आकड्यांकडे लक्ष देऊ नका”

मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात येत असताना असा उल्लेख संजय राऊत यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी “नाही असं मी म्हणणार नाही,” असं स्पष्टपणे सांगितलं. “असं जर का आपण समजूत केली तर आपण गाफिल आहोत असं होईल. त्यामुळे कृपा करुन तुम्ही त्या आकड्यांकडे लक्ष देऊ नका,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.