सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिवंगत खासदार गुलाबराव पाटील यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांचे सहकार क्षेत्रात खूप मोठे योगदान लाभले आहे. या कार्यक्रमात सहकारतपस्वी गुलाबराव पाटील यांच्या आयुष्यावर आधारित चित्रफीतीचे अनावरण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकार क्षेत्राबाबत आपलं मनोगत व्यक्त केलं. जयंत पाटील यांच्या भाषणातील सहकार क्षेत्राच्या अडचणींचा धागा पकडत इतर क्षेत्रांच्या अडचणींचा पाढा वाचला. “असं कोणतंही क्षेत्र नाही त्याला अडीअडचणीचा सामना करावा लागत नाही. सगळ्या क्षेत्रामध्ये आहे. राजकारणामध्येही वरखाली चालू राहतं.”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“मनोगतात एक वाक्य आहे दिल्लीत जाऊन बसण्यापेक्षा माझा महाराष्ट्र उभा करेन. हा केवढा मोठा विचार आहे. अनेक जणांना दिल्ली दरबारी जाऊन उभंच राहावं लागतं. बसायला पण मिळत नाही.”, असा अप्रत्यक्षरित्या टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही हसू आवरता आलं नाही. त्यानंतर त्यांनी हसू आवरत भाषण पुन्हा सुरु केलं. “अशा वातावरणात बसायची संधी नाकारून मी माझ्या राज्याला उभा करेन. हाच एक मोठा क्रांतीकारक विचार आहे. मी माझं राज्य आणि अस्मिता हा फार मोठा विचार आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढे सांगितलं.

या कार्यक्रमाला विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, उद्धव ठाकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, विधानपरिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते