23 January 2021

News Flash

राज्यातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी

भंडारा येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश

भंडारा येथील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश; मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत

मुंबई : भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत १० नवजात शिशूंचा मृत्यू होणे, ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे, अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि राज्यातील सर्व रुग्णालयांच्या अग्निसुरक्षेची तपासणी ( फायर ऑडिट) करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. आगीच्या घटनेतील मृत शिशूंच्या पालकांना पाच लाख रुपये मदत मुख्यमंत्री निधीतून देण्याची घोषणाही ठाकरे यांनी के ली.

सध्या राज्यभरातील आरोग्य यंत्रणा व सर्व रुग्णालये करोनाशी लढत आहेत. मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड चालणार नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. या घटनेविषयी कळताच मुख्यमंत्री ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली.  या आगीतून अग्निशमन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सात बालकांना वाचविले आणि आग पसरू नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यामुळे संपूर्ण रुग्णालय वाचले. या वाचलेल्या बालकांवर कोणतीही हयगय न होता व्यवस्थित उपचार करण्याचे  निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

ही घटना मन सुन्न करणारी आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, कोवळ्या जिवांना मरण आले. कितीही सांत्वन केले तरी हे दु:ख भरून येणारे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून या अतिशय दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या शिशूंच्या पालकांच्या भावना समजू शकतो, त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज्य शासन त्यांच्या या दु:खात सहभागी आहे. या दुर्घटनेसाठी जे जबाबदार असतील, त्यांची चौकशी करून तत्काळ कठोर कारवाई करण्यास गृहमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना सूचना दिल्या आहेत.

नागपूरच्या अग्निशमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे तज्ज्ञ आणि विद्युत विभागाचे अधिकारी भंडारा येथे उपस्थित असून आगीच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहेत, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की. या इमारतीतील बालकांसाठीच्या या नव्या कक्षाचे लोकार्पण २०१५ मध्ये झाले होते. मात्र त्याच्या अग्निसुरक्षेचे (फायर ऑडिट) झाले होते का, आणि झाले नसेल तर का झाले नव्हते, याविषयी संपूर्ण माहिती घेऊन पुढील कारवाई लगेच करण्यात येईल. या दुर्घटनेच्या तपासाची अद्ययावत माहिती दररोज कळविण्याचे निर्देशही संबंधितांना दिले आहेत.

चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती

’भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणातील  बालकांच्या मृत्यूच्या घटनेच्या चौकशीसाठी आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली  असून ही समिती शासनाला तीन दिवसांत अहवाल सादर करेल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी सांगितले.

’भंडारा जिल्हा रुग्णालयाला दुपारी टोपे यांनी भेट दिली. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले  आणि भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यावेळी उपस्थित होते.  भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी कोणते उपाय योजण्यात यावेत याची शिफारस करण्यासही समितीला सांगण्यात आले आहे.

’ प्रत्यक्षदर्शींचीही समितीसोबतच पोलिसांकडूनही चौकशी केली जाणार आहे.  या आपत्तीत तातडीने मदतकार्य करून इतर बालकांचा जीव वाचविणाऱ्या  परिचारिका आणि वार्डबॉयचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. भोजापूर येथील गीता विश्वनाथ बेहरे यांचे बाळ या घटनेत दगावले आहे. आरोग्यमंत्र्यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले.

उपाययोजना कागदावरच 

* भंडाऱ्यातील दुर्घटनेनंतर राज्यातील सर्व रुग्णालयांमधील अग्निसुरक्षेच्या उपायांचा आढावा घेण्याचा आदेश देण्यात आला असला तरी एखादी दुर्घटना घडल्यावर आठवडाभर ओरड होते, चौकशीची घोषणा होते, अहवाल प्राप्त होतो पण उपायांबाबत काहीच कारवाई होत नाही हा नेहमीचा अनुभव.

* दोन वर्षांपूर्वी  अंधेरीमधील कामगार वीमा रुग्णालयाला लागलेल्या आगीत १० जण ठार तर १५० पेक्षा अधिक रुग्ण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर सरकारने राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये अग्निसुरक्षेचे उपाय योजण्याचे आदेश दिले होते तसेच त्याचा आढावा घेतला जाईल, असे जाहीर के ले होते. पुढे १० ते १५ दिवस चर्चा होत राहिली. प्रकरण शांत होताच रुग्णालयांच्या अग्नि सुरक्षेचा प्रश्न मागे पडला.

* एखादी दुर्घटना घडल्यावर उपाय योजण्याचे आदेश दिले जातात, पण त्याची कार्यवाही झाली की नाही हे तपासण्याची यंत्रणा नाही वा तपासणी के ली जात नाही, असा अनुभव एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितला.

भंडारा जिल्हा रुग्णालयात १० नवजात बालकांचा मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि जे दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, या रुग्णालयाचे अग्निशमन अंकेक्षण का झाले नाही याची चौकशी व्हावी, या घटनेत जे बालक दगावले  त्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत देण्यात यावी.

देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.

****

या घटनेचे वृत्त ऐकून मन हेलावून गेले आहे. ज्या कुटुंबातील मुलांच्या या घटनेत मृत्यू झाला त्या सर्वांच्या दु:खात मी सहभागी आहे.

नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.

****

या घटनेपासून धडा घेतला पाहिजे. योग्य उपाययोजना करुन भविष्यात  अशा घटना घडणार नाही, या साठी प्रयत्न केले जातील.

नाना पटोले, विधानसभा अध्यक्ष.

*****

या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी तीन गट तयार करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी नेमके काय घडले, शॉर्टसर्किट कसे झाले, याची सगळी माहिती घेतली जात आहे. यात निष्काळजीपणा झाला असेल संबंधिताला शिक्षा होईल. अशा घटना यापुढे घडू नये यासाठी रुग्णालयांचे अंकेक्षण केले जाईल.

राजेश टोपे, आरोग्यमंत्री.

*****

घटना अतिशय दुर्दैवी असून या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. दोषी आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या परिवाराला सवतोपरी मदत केली जाईल.

अनिल देशमुख, गृहमंत्री.

******

घटनेची माहिती कळताच आरोग्य मंत्र्यांच्या संपर्कात राहून योग्य त्या सूचना दिल्या. या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आले त्यात कुणी दोष आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

विश्वजित कदम, पालकमंत्री, भंडारा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 1:52 am

Web Title: cm uddhav thackeray order of fire audit of all hospital in maharashtra zws 70
Next Stories
1 रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेची तपासणी नाही!
2 राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण
3 राज्यातील करोनामृतांची संख्या ५० हजारांवर
Just Now!
X