राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विशेष मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीला ‘अभिनंदन मुलाखत’ असं नाव देण्यात आलं आहे. यापूर्वीही संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीही मुलाखत घेतली होती. त्यामध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली होती.

महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीनिमित्तची मुख्यमंत्र्यांची मुलाखत सामना या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली जाणार आहे. २७ नोव्हेंबर रोजी ही मुलाखत प्रसिद्ध केली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री या मुलाखतीत कोणकोणत्या विषयांवर भाष्य करणार हे पाहावं लागेल.

राज्यातील करोना स्थिती, भाजपा शिवसेना यांच्यात सुरू असलेली शाब्दीक चकमक, सरकारनं घेतलेले महत्त्वाचे निर्णय, सरकारसमोरील आव्हानं यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेना यांच्यात शाब्दीक चकमक सुरू आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांवर काही गंभीर आरोप केले होते. तर प्रताप सरनाईक यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांनीही इशारा दिला होता. कंगना रणौतच्या कार्यालयावरही पालिकेनं केलेल्या कारवाईनंतर सरकारवर टीका करण्यात आली होती. तर रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतही सरकारवर टीका करण्यात आली होती. या सर्व प्रश्नांवर मुख्यमंत्री भाष्य करणार का हेदेखील पाहावं लागणार आहे.