“करोनच्या संकटांशी जे लोक अविरपणे लढत आहेत. राज्य हे आपलं कुटुंब मानून जे झटत आहेत त्या सगळ्या डॉक्टरांना माझा मानाचा मुजरा” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या डॉक्टरांचे आभार मानले. सोशल मीडियाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या डॉक्टरांचे आभार मानले.

सगळ्या डॉक्टरांचा मला अभिमान

“सरकार आपली मदत करतच आहे, आपण घरात राहून सरकारला सहकार्य करा. मी गेले काही दिवस कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यातलं नायडू रुग्णालय यामधल्या डॉक्टरांशी बोललो. डॉक्टर पवार आपल्या कस्तुरबामध्ये आहेत तर पाटसुते हे नायडू रुग्णालयात आहेत. डॉक्टर पाटसुते यांनी पहिला आपल्याकडे आलेला करोनाचा रुग्ण ओळखला. त्याची लक्षणं बघून त्यांनी सांगितलं की याला करोनाची लागण झाली आहे. तर या डॉक्टरांशी आणि इतर डॉक्टरांशीही मी बोलत असतो. डॉक्टरांचा मला अभिमान वाटतो तो एवढ्यासाठी की एवढं मोठं संकट आपल्या राज्यावर आणि देशावर असताना हे सगळे वीर लढत आहेत. या डॉक्टरांना आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना आपल्या सर्वांच्या साक्षीने मी मानाचा मुजरा करतो. नागपूर, यवतमाळ आणि प्रत्येक जिल्ह्यात करोनाच्या संकटाशी जे डॉक्टर लढत आहेत त्या सगळ्यांना मी मानाचा मुजरा करतो आहे” असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

डॉक्टरांशी बोलून माझं मनोधैर्य नक्की वाढतं

“मला काही लोकांनी सांगितलं उद्धवजी तुम्ही या डॉक्टरांशी बोला म्हणजे त्यांचं मनोधौर्य वाढेल. मी रोज संवाद साधतो आहेच. मात्र त्यांचं मनोधैर्य वाढतं आहे की नाही माहित नाही त्यांच्याशी बोलून माझं मनोधैर्य वाढतं आहे हे निश्चित. आजही त्यांना फोन केला की ते गोंधळलेले नाहीत. त्यांच्यात कुठेही भीतीचं किंवा दहशतीचं वातावरण नाही. मी त्यांना फोन केल्यानंतर विचारतो डॉक्टरसाहेब आपण कसे आहात? तर ते मला विचारतात साहेब आपण कसे आहात? आपण काळजी घ्या. काय म्हणायचं या वीरांना, काय म्हणायचं या शूरांना? त्यांच्याशी बोललो की माझं मनोधैर्य वाढतं. ही सगळी अशी अहोरात्र मेहनत करणारी माणसं आहेत म्हणजे आपणच त्यांचा विचार केला पाहिजे.” असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच गरज नसेल तर बाहेर पडूच नका असं आवाहन पुन्हा एकदा त्यांनी केलं.