25 February 2021

News Flash

मोदींच्या ड्रिम प्रोजेक्टवर सावट, ठाकरे सरकार रोखणार बुलेट ट्रेन?

बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार

(सांकेतिक छायाचित्र)

सत्तेत येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आरे’मधल्या मेट्रोच्या कारशेड बांधकामाला स्थगिती देण्याचा मोठा निर्णय घेतल्यानंतर आता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘ड्रिम प्रोजेक्ट’ असलेल्या बुलेट ट्रेनबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसतंय. बहुचर्चित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फेरआढावा घेणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

विधिमंडळात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या पाच वर्षांत आम्ही सत्तेत होतो. पण पाच वर्षांत विकासकामं कधी, कुठे कशी झाली, किती खर्च झाला याबाबत मी माहिती मागवली आहे. त्या सगळ्यांची श्वेतपत्रिका काढणार आहोत. काही विकासकामं ज्यांची तातडीने आवश्यकता नाही ते पाहात आहोत. हे फक्त माझं सरकार नाही…तर तुमचं सर्वांचं सरकार आहे. सर्वसामान्यांचं हे सरकार आहे. बुलेट ट्रेनचा फेरआढावा घेऊ, बुलेट ट्रेन अजूनही रद्द केली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आरे करशेड व्यतिरिक्त मी मेट्रोच्या कोणत्याही कामाला विरोध केला नाही. आक्षेप असता तर मेट्रो अडवली असती. काही विकासकामं करणं गरजेचं आहे; पण ती कामं रखडलेली आहे तेही पाहणार आहोत, असं मुख्यमंत्री म्हणाले. यासोबतच सुडाच्या भावनेने हे सरकार काम करणार नाही, इतर सर्व प्रकल्पांचा जसा फेरआढावा घेण्यात येणार आहे, तसाच तो बुलेट ट्रेन प्रकल्पाचाही असेल. असंही ठाकरेंनी स्पष्ट केलं.

सत्तेत येताच मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडला स्थगिती दिल्यामुळे राज्यातील होऊ घातलेल्या अनेक प्रकल्पांबाबत चर्चा रंगली आहे. फडणवीसांच्या काळात सुरू झालेल्या प्रकल्पांचं काय होणार? राज्य सरकार त्यात बदल करणार का? केंद्राची मदत त्या प्रकल्पांना मिळेल का? असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पाबाबत –

-अहमदाबाद आणि मुंबई शहरादरम्यान बुलेट ट्रेन सुरू करण्याची घोषणा २०१५ मध्ये करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याची मुदत आधी २०२२ ठरवण्यात आली होती, पण आता ती २०२३ पर्यंत पुढे गेली आहे.

-या प्रकल्पाचं काम अधिकृतरीत्या सप्टेंबर २०१७ मध्ये सुरू करण्यात आलं.

-सध्या वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वांत वेगवान ट्रेन आहे. चाचणीवेळी या गाडीने १८० किमी प्रति तासापर्यंतचा वेग गाठला होता. तर जपानमधील बुलेट ट्रेन ३२० किमी प्रति तासापर्यंतच्या वेगानं धावू शकते.

-१,०४९ कोटींहून अधिक रुपयांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सूरत, अहमदाबाद आणि मुंबई ही भारतातील महत्त्वाची आर्थिक केंद्र या द्रुतगती मार्गाने जोडली जाणार आहेत.

-सध्या या जवळजवळ ५०० किमीच्या प्रवासाला आठ तास लागतात, जो बुलेट ट्रेनमुळे फक्त दोन तास सात मिनिटांत पूर्ण करता येईल.
-आतापर्यंत या प्रकल्पासाठी लागणाऱ्या एकूण १,३८० हेक्टर जमिनीपैकी ५४८ हेक्टर जमीन सरकारने ताब्यात घेतली आहे. पालघरमध्ये लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 2, 2019 1:09 pm

Web Title: cm uddhav thackeray says we will review bullet train project sas 89
Next Stories
1 पंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत?, राऊत म्हणाले…
2 पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?; भाजपाला बसणार हादरा
3 ‘केंद्राकडे भीक का मागताय?’; निलेश राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल
Just Now!
X