“करोनानंतरचं जग बदलेलं असेल. मात्र, करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे,” असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘लोकसत्ता’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘साठीचा गझल.. महाराष्ट्राचा’ या वेबसंवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीने या उपक्रमाची सांगता झाली.

यावेळी ते म्हणाले की, “करोनाबरोबर जगायला शिका हे म्हणणं ही आपली अपरिहार्यता आहे. करोनानंतरचं जग बदलेलं असेल. करोनासोबत जगायचं म्हणजे आपल्याला लाईफस्टाईल बदलावी लागणार आहे. आता आपल्याला हळूहळू बंदी उठवावी लागेल.” “लॉकडाउन हा शब्द म्हणण्यापेक्षा लॉक सोबत घेऊन फिरा असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. मास्क घालणं, सुरक्षित अंतर राखणं, सॅनिटाझर वापरणं असे उपायदेखील आपल्याला करावे लागणार आहेत. सध्या शक्य-अशक्य अशा अनेक गोष्टी आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.

लस आल्यानंतर मोहीम राबवावी लागेल

“सध्या करोनावर लस उपलब्ध नाही. अनेक ठिकाणी त्यावर संशोधन सुरू आहे. लस आल्यानंतर आपल्याला पोलिओसारखी मोहीम राबवावी लागणार आहे. यासोबतच स्वयंशिस्त हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. सध्या करोनाच्या या आणीबाणीजन्य परिस्थितीत आरोग्यसुविधा वाढवणं महत्त्वाचं आहे. यासोबतच मृत्यूदर कमी करणं हेदेखील महत्त्वाचं आहे. डॉक्टरांना औषधं मिळणं जसं महत्त्वाचं आहे तसं डॉक्टरांना रुग्ण वेळेत मिळणंही आवश्यक आहे. लोकांनीही थोडीफार लक्षणं दिसली तरी चाचणी करून घेणं आवश्यक आहे,” असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

८० टक्के लोकांमध्ये लक्षणं नाही

“केद्राकडून, आयसीएमआरकडून आम्हाला करोनासंदर्भात सतत मार्गदर्शन होत होतं. कोणाच्या चाचण्या केल्या पाहिजेत, किती दिवसांनी चाचण्या कराव्या, गाईडलाइन्स अशा सर्व सुचना सरकारकडून आम्हाला येत होत्या. आतापर्यंत काही प्रमाणात कम्युनिटी स्प्रेड आहे. ते नाकारता येत नाही,” असंही मुख्यमंत्री म्हणाले. “आपल्याला जे रुग्ण सापडत आहेत त्यांच्यात काही लक्षणं नसल्याचं असं दिसत आहे. ज्यांच्या आतापर्यंत चाचण्या झाल्या त्यापैकी अनेक जण असेही आहेत ते औषधाशिवायही बरे झाले आहेत. ज्यांच्यात काही प्रमाणात लक्षणं दिसली आहेत त्यांच्या चाचण्या करण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. जवळपास ८० लोकांमध्ये लक्षणं दिसत नाही हे दिलासादायक असलं तरी ते त्रासदायकही ठरू शकतं. कारण त्यांच्यात लक्षणं दिसत नसली तरी त्यांच्यामुळे प्रसार होऊ शकतो,” असंही त्यांनी नमूद केलं.