उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र नाराजीनाट्य, खदखद आता हळूहळू बाहेर येते आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही अशी खदखद शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली आहे. ” मी गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना प्रदेशाध्यक्षपदही भूषवलं आहे. एवढा अनुभव असताना मी कुठे कमी पडलो ते कळलंच नाही. शिवसेनेत प्रवेश करताना माझी उद्धव ठाकरे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली होती. त्यांनी आश्वासनही दिलं होतं मात्र दिलेलं आश्वासन, शब्द त्यांनी पाळला नाही. मला कशाचाही मोह नाही मात्र उद्धव ठाकरे यांनी शब्द पाळला नाही याचं वाईट वाटलं.” असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हाच संजय राऊत यांच्या गैरहजेरीची चर्चा रंगली होती. कारण सुनील राऊत यांना मंत्रिपद दिलं गेलं नाही म्हणून ते नाराज आहेत अशी चर्चा रंगली. मात्र संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत अशी कोणतीही नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. असं असलं तरीही मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे. वाशिमच्या भावना गवळी यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर नाराज असल्याचं बोलून दाखवलं. तर आता भास्कर जाधव यांनीही त्यांची नाराजी बोलून दाखवली आहे. शिवसेना प्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंनी शब्द दिला होता तो त्यांनी पाळला नाही असं भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.

पुण्यात काँग्रेस आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रिमंडलातून डावलल्याने त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस भवन या ठिकाणी तोडफोड केली. तसंच कोल्हापुरात पी. एन. पाटील यांना मंत्री पद न मिळाल्याने त्यांचे समर्थकही नाराज आहेत.