News Flash

“त्यांनी त्यांचा महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिला असल्याने ते…”; उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका

"मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर..."

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये जाऊन महाराष्ट्रातील करोना परिस्थितीसंदर्भातील माहिती वरिष्ठ नेत्यांना देणाऱ्या फडणवीस यांच्याकडून आपण सल्ला आणि सूचना मागवल्या होत्या असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत. इतकचं नाही तर “त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात,” असा टोलाही उद्धव यांनी फडणवीसांना लगावला आहे. या वक्तव्यामधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या पीएम केअर्स या करोना मदतनिधीसाठी महाराष्ट्र भाजपाने राबवलेल्या मोहिमेवर उद्धव यांनी निशाणा साधला आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे ठाकरे शैलीतील फटकारे लगावले आहेत.

नक्की वाचा >> ‘राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाउन का करावं लागत आहे?’; मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात प्रश्न विचारला. “राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस काल दिल्ली होते,” अशी राऊत यांनी प्रश्नाची सुरुवात करताच, “तिथली करोनाची परिस्थिती बघत होते ते” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “तिथे दिल्लीत जाऊन ते (फडणवीस) महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीबद्दल बोलले आहेत,” असं पुढलं वाक्य संजय राऊत यांनी उच्चारताच उद्धव यांनी आणखीन एक व्यक्तव्य करत थेट या भेटीचा संबंध थेट महाराष्ट्र भाजपाच्या पीएम केअर्ससाठी निधी गोळा करण्याचा मोहिमेशी लावला. फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन महाराष्ट्राची परिस्थिती सांगण्यामागील कारणाबद्दल बोलताना, “त्यांनी त्यांचा जो महाराष्ट्राचा फंड आहे तो दिल्लीत दिल्ल्याने ते सगळ्या गोष्टी दिल्लीत जाऊन करतात,” असा टोला उद्धव यांनी लगावाला. राऊत यांनी “राज्यातील भयावह परिस्थितीचे अपडेट्स त्यांनी प्रधानमंत्र्यांनाही भेटून देणं हे कितपत योग्य आहे?,” असा प्रश्न उद्धव यांना विचारला.

“कुठेही न जाता कुठेही न फिरता…”

“मी कोण काय बोलतं याकडे लक्ष देत नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे. हे ठीक आहेत हे बोलतील पण कुठेही न जाता कुठेही न फिरता ज्या एका संस्थेने, खरं तर ती संस्था कोणती आहे ते मी पाहिलं नाही. मात्र त्या संस्थेने देशाच्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. ही सुद्धा त्यांची पोटदुखी असू शकेल, कारण करोनाची लक्षणे वेगवेगळी आहेत,” अशा शब्दांमध्ये फडणवीस यांच्यावर टीका केली.

नक्की वाचा >> “..तेव्हा मुख्यमंत्री किती विचारल्यावर आपण यशवंतरावांपासून सांगत नाही”; करोनासंदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची ‘मार्मिक’ प्रतिक्रिया

“मी फिरत नाही घरी बसतो म्हणून…”

“मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील प्रादुर्भाव वाढतोय. तुम्ही या विषाणूच्या वागणुकीचा आलेख पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की हा गुणाकार करत जातोय. जिथे पाहिली सुरुवात होते तिथे तो शिखरावर जातो. त्यानंतर तो कर्व्ह फ्लॅट होऊन कमी होतो. जिथे उशीरा सुरु होतो संसर्ग तिथे तो उशीरा शिखरावर जातो. या मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे उशीरा सुरु झालं आहे तिथे तो उशीराने शिखरावर चालला आहे. त्यामुळे ही शहर आणि परिसर कालांतराने बाहेर पडतील,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी दिलेलं इतकं सविस्तर उत्तर ऐकून संजय राऊत यांनी, “हे उत्तर ऐकून तुम्हाला डॉक्टरेट मिळाली पाहिजे रिसर्चसाठी,” अशी प्रतिक्रिया दिली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, “मी तेवढा अभ्यास नाही केला तर मी मुख्यमंत्री राहून काय करु,” असं म्हटलं. राऊत यांनी, “या देशामध्ये करोनावरती इतक्या खोलवर अभ्यास करणारे मला तुम्ही एकमेव मुख्यमंत्री दिसत आहात,” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं. या कौतुकावरुन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. “मी फिरत नाही घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी नोंदवली.

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंनी सांगितलं करोना काळामध्ये मंत्रालयात न जाण्याचं कारण, म्हणाले…

“त्या बैठकीमध्ये मी त्यांना मोकळेपणाने…”

“विरोधी पक्ष हा लोकशाहीचा खूप महत्वाचा भाग आहे. मी महिन्याभरापूर्वी घेतलेल्या सर्व पक्षाच्या नेत्यांची बैठकीच्या वेळी त्यांना मोकळेपणाने चर्चेसंदर्भात सांगितलं होतं. आपले काही सल्ले आणि सुचना असतील तर सांगा असं मी त्यांना म्हटलं होतं,” अशी प्रतिक्रिया उद्धव यांनी विरोधी पक्ष नेत्यांसदर्भातील प्रश्नावर बोलताना दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 9:31 am

Web Title: cm uddhav thackeray slams opposition leader devendra fadnavis over his delhi visit scsg 91
Next Stories
1 ‘राज्यातील अनेक शहरांमध्ये पुन्हा पुन्हा लॉकडाउन का करावा लागत आहे?’; मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
2 “..तेव्हा मुख्यमंत्री किती विचारल्यावर आपण यशवंतरावांपासून सांगत नाही”; करोनासंदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची ‘मार्मिक’ प्रतिक्रिया
3 चंद्रपूर : नियमांचे उल्लंघन केल्याने लग्न समारंभाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल
Just Now!
X