घाबरून जाऊ नका, सध्या जे आहे तसंच सुरू राहिल, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकांनी काळजी करू नये म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवार) देशातील नागरिकांना संबोधित करताना देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक ठिकाणी लोकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती दिली. तसंच लोकांना न घाबरण्याचं आवाहन केलं.

“माझं पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्याशी बोलणं झालं आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले जे नियम आहेत ते तसेच राहतील. जीवनावश्यक सोयी व सुविधा सुरूच राहतील. कोणीही गोंधळू नये, घाबरु नये आणि रस्त्यावर, दुकानात बाजारपेठेत गर्दी करू नये,” अशा आशयाचं ट्विट उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केलं होतं. तसंच संपूर्ण देशात मध्यरात्रीपासून लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. तसंच त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील लोकांना दुकांनांवर गर्दी न करण्याचं आवाहन केलं होतं.

काय म्हणाले टोपे ?

“संपूर्ण राज्यात अन्न-धान्याचा पुरेसा साठा आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्र्यांनी सर्व रेशन दुकानांना सध्याच्या घडीला योग्य प्रमाणात धान्य मिळेल याची सोय केली आहे. त्यामुळे नागरिकांनी धान्याची चिंता करु नये….जिवनावश्यक वस्तू तुम्हाला मिळत राहणार आहे. फक्त किराणा माल, रेशनच्या दुकानावर जात असताना गर्दी करणं टाळा…सोशल डिस्टन्स राखणं हे गरजेचं आहे. नागरिकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही.” राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं.