“करोना व्हायरसबाबत अनेक बातम्या कानावर येत असाताना एक दिलासादायक बातमीही समोर आली आहे. ठिकाणी याची सुरूवात झाली त्या चीनमधील वुहानमध्ये सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सर्वकाही सुरळीत झालं आहे हे चित्र दिलासादायक आहे. ७५ ते ७६ दिवसांनंतर हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे जर का हे ताणलं गेलं तर कुठवर जाऊ शकते याची चुणूक यातून येते,” असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. आज (बुधवार) त्यांनी राज्यातील जनतेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

“जगभरात काय चाललंय हे आपण पाहतोय. अमेरिकेत काय परिस्थिती निर्माण झाली आहे हेदेखील आपल्याला दिसत आहे. जपानमध्ये तर आरोग्य आणीबाणी लागू होण्याची शक्यता आहे आणि सिंगापूरसारखा देश पुन्हा लॉकडाउनमध्ये गेला आहे. या सर्व बातम्या कानावर येत असताना आणखी एक बातमी समोर आली ती म्हणजे ज्या ठिकाणी याची सुरूवात झाली त्या चीनमधील वुहानमध्ये सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी सर्वकाही सुरळीत झालं आहे ही दिलासादायक बातमी आहे. ७५ ते ७६ दिवसांनंतर हे निर्बंध हटवण्यात आले आहेत. परंतु हे ताणलं गेलं तर कुठवर जाऊ शकतं याची चुणूक यातून येते,” असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

आणखी वाचा- मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद; मात्र लॉकडाउनबद्दल संभ्रमावस्था कायम

करोनानंतर आर्थिक युद्ध
करोनाचं युद्ध आपण नक्की जिंकणार आहोत, असा विश्वास त्यांनी राज्याच्या जनतेला दिला. तसंच या काळात घरात बसून सर्वांनी व्यायाम करून आपलं आरोग्य आणि मानसिक आयोग्यही उत्तम ठेवावं, असं ते म्हणाले. करोनाच्या युद्धानंतर आपल्या समोर आणखी एक मोठं आर्थिक युद्ध उभं राहणार आहे. त्यासाठीही आपल्याला तयार राहायचं आहे, असं त्यांनी नमूद केलं.

आणखी वाचा- Coronavirus: उद्धव ठाकरे यांनी घरी व्यायाम करण्याचा सल्ला का दिला?

आपण एकसंध
सध्या राज्यात जे टीमवर्क आहे ते खूप चांगल्या प्रकारे सुरु आहे. आपण सगळेजण एकसंध कसे राहात आहोत हे पाहिलं जातं आहे. आपल्याकडे रुग्णांची वाढ होते आहे ही बाब चिंतेची आहे. करोना आपल्या मागे लागला आहे. मात्र करोनाच्या मागे आपण हात धुवून लागलो आहोत. घरी बसून सगळ्यांना कंटाळा आला आहे. पण सध्या आपल्याकडे काहीही इलाज नाही. घरात राहूनही आपली जनता तणावमुक्त कशी राहिल हे वृत्तवाहिन्यांनी पहावं असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

आणखी वाचा- तुमची महाराष्ट्राला गरज; निवृत्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचं आवाहन

मास्क छत्रीसारखे वापरु नका
जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. दुकानात जाऊन मास्क विकत घेण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरीही कापडाचा मास्क तयार करा आणि तो वापरा. मास्क हे छत्रीसारखे वापरु नका. ज्याचा मास्क आहे तो त्यानेच वापरावा असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मास्क अत्यंत दक्षतेने वापरा. एकाचा मास्क दुसऱ्याने वापरु नका असंही त्यांनी ते स्पष्ट केलं.

आणखी वाचा- करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी तीन प्रकारची वेगवेगळी रुग्णालयं, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

विषाणूचा गुणाकाराचा काळ
महाराष्ट्रात आत्तापर्यंत २१ हजार जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. २२०० लोकांना आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं आहे. १५ ते १७ हजार चाचण्या आत्तापर्यंत झाल्या आहेत. ज्यांची लक्षणं सौम्य आहेत असे ६१० आहे.