राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘मिशन बिगिन अगेन…’ अर्थात ‘पुनःश्च हरिओम’ हा नारा देत राज्यामधील लॉकडाउनचे नियम शिथिल करत असल्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर पुन्हा जुलै महिन्यापासून राज्यातील अनेक शहरांमध्ये टप्प्या टप्यात लॉकडाउन करण्यात आलं आहे. मात्र अशाप्रकारे केवळ आपल्यालाच पुन्हा लॉकडाउन करावा लागत नसून लॉकडाउन करताना जतनेच्या आरोग्याचा तसेच अर्थव्यवस्थेचा एकाच वेळी विचार करणं गरजेचं असतं असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची विशेष मुलाखत घेतली, याच मुलाखतीत त्यांनी लॉकडाउनसंदर्भात भाष्य केलं आहे.

“ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ यासारख्या मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांबरोबरच अगदी पिंपरी चिंचवड, चंद्रपूरसारख्या ठिकाणाही पुन्हा लॉकडाउन करावा लागत आहे. तर अशाप्रकारे परत परत लॉकडाउन करण्याची वेळ का येत आहे?,” असा प्रश्न राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउनचा विचार करताना आर्थिक आणि आरोग्यासंदर्भातील बाजूही लक्षात घेणं महत्वाचं असल्याचे सांगितले. “एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की परत परत शहरं लॉकडाउन करण्याची वेळ आपल्यावरच आलेली नाहीय. हे जागतिक कटू सत्य आहे की या विषयावर नेमकेपणे सल्ला देणारं आणि बोलणारं जगामध्ये कोणीच नाहीय,” असं सांगत उद्धव यांनी सगळीकडेच वेळोवेळी पुन्हा लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला जात असल्याचे सूचित केलं.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, “ग्रामीण भागांमध्ये पावसाळ्यात करोना केंद्र सुरु करायची असतील तर…”

“…तर तुम्ही घेणार का त्याची जबाबदारी?”

पुढे बोलताना उद्धव यांनी, “एका बाजूला लॉकडाउन केला पाहिजे का?, तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत. लॉकडाउनने काय साधलं?, लॉकडाउन म्हणजे उपचार आहे का?, लॉकडाउनने आर्थिक संकट येत आहे, लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला. ठीक आहे बाबा, आम्ही तुम्हाला उघडून देतो. मात्र त्यानंतर दुर्देवाने लोकं मृत्यूमुखी पडले तर तुम्ही घेणार का त्याची जबाबदारी? जे आज सरकारच्या दारी येऊन बसले आहेत. दार उघडं म्हणून टाहो फोडत आहेत त्यांना इतकचं सांगेन की दारं उघडायला हरकत नाहीय. पण दारं उघडल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का?,” असा सवाल लॉकडाउनवरुन टीका करणाऱ्यांना विचारला आहे.

“अर्थव्यवस्था की आरोग्य?, ही तारेवरची कसरत आहे”

“मी असं कधीच म्हणणार नाही की लॉकडाउन मी उठवतोय. नाही मी अजिबात असं म्हणणार नाही. पण मी हळूहळू एक एक गोष्टी उघड्या करत चाललो आहे. माझा प्रयत्न असा आहे की एकदा उघडलेली गोष्ट बंद होता कमा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा किंवा नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करुन चालणार नाही. जे केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करतायत त्यांनी आरोग्याची थोडीफार तरी चिंता केली पाहिजे. तसेच जे केवळ आरोग्याची चिंता करत आहेत त्यांनी आजच्या घडीला हे जरी सत्य असलं तरी थोडी आर्थिक चिंता पण करायला हवी. या सर्वाचं तारतम्य ठेऊन विचार केला पाहिजे. ही तारेवरची कसरत आहे. करोनाबरोबर जगायला शिकायचं म्हणजे ही तारेवरची कसरत करायला शिकलं पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

नक्की वाचा >> “..तेव्हा मुख्यमंत्री किती विचारल्यावर आपण यशवंतरावांपासून सांगत नाही”; करोनासंदर्भातील प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची ‘मार्मिक’ प्रतिक्रिया

मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांमधील करोना प्रादुर्भावासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात…

“मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील प्रादुर्भाव वाढतोय. तुम्ही या विषाणूच्या वागणुकीचा आलेख पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की हा गुणाकार करत जातोय. जिथे पाहिली सुरुवात होते तिथे तो शिखरावर जातो. त्यानंतर तो कर्व्ह फ्लॅट होऊन कमी होतो. जिथे उशीरा सुरु होतो संसर्ग तिथे तो उशीरा शिखरावर जातो. या मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे उशीरा सुरु झालं आहे तिथे तो उशीराने शिखरावर चालला आहे. त्यामुळे ही शहर आणि परिसर कालांतराने बाहेर पडतील,” असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

“मी फिरत नाही घरी बसतो म्हणून…”

मुख्यमंत्र्यांनी दिलेलं इतकं सविस्तर उत्तर ऐकून संजय राऊत यांनी, “हे उत्तर ऐकून तुम्हाला डॉक्टरेट मिळाली पाहिजे रिसर्चसाठी,” अशी प्रतिक्रिया दिली. यावर उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी, “मी तेवढा अभ्यास नाही केला तर मी मुख्यमंत्री राहून काय करु,” असं म्हटलं. राऊत यांनी, “या देशामध्ये करोनावरती इतक्या खोलवर अभ्यास करणारे मला तुम्ही एकमेव मुख्यमंत्री दिसत आहात,” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांचे कौतुक केलं. या कौतुकावरुन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. “मी फिरत नाही घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी नोंदवली.