News Flash

निजामुद्दीनसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही-उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात कोणत्याही जाती, धर्माचे सण किंवा मेळावे होणार नाही याची काळजी घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं

उद्धव ठाकरे

निजामुद्दीनसारखे प्रकार महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. दिल्लीतल्या निजामुद्दीन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मरकजमुळे करोनाचे रुग्ण वाढले. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अशात महाराष्ट्रातल्या विविध भागातले लोक या मरकजला उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. त्यामुळे मरकजसारखे प्रकरण महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोनाचे संकट संपेपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही जाती, धर्माचे सण किंवा मेळावे होणार नाही याची काळजी घ्या, प्रसंगी मी स्वतः आयोजकांशी बोलेन असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

करोनाचे संकट जाईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही निमित्ताने गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. आज त्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे करोना उपाय योजनांचा आढावा घेतला त्यावेळी अधिक काळजी घेण्याच्या आणि मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही केले. मुख्यमंत्री सचिवालयाच्या जनसंपर्क कक्षाने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

बाजारांमध्ये गर्दी दिसता कामा नये

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, विलगीकरणाचे पालन झालेच पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत गर्दी दिसली नाही पाहिजे यासाठी जे जे तुमच्या अधिकारांत आहे ते करा. आपण नागरिकांच्या सुविधेसाठी २४ तास दुकाने उघडी ठेवली आहेत मात्र काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत असे दिसते. भाजी बाजारांमध्येही सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आहेत. त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजाराला दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या असंही त्यांनी स्पष्ट केलं.

परराज्यातील कामगार,श्रमिकांची संपूर्ण काळजी घ्या

परराज्यातील कामगार, स्थलांतरित यांच्यासाठी आपण राज्यात निवारा केंद्रं सुरु केली आहेत. त्यात कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यांना पुरेशा सोयी मिळतील हे पाहा अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्या. जिल्हा बंदी तसेच राज्य बंदीची काटेकोर अमलबजावणी झाली पाहिजे. यात कुचराई झाल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2020 9:40 pm

Web Title: cm uddhav thackeray warn public over nizamudden case scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 महाराष्ट्रातील करोनाच्या उपाय योजनांबाबत मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये फोनवरुन चर्चा
2 PM Cares फंड सुरु करुन मोदींनी सोडली नाही सेल्फ प्रमोशनची संधी-पृथ्वीराज चव्हाण
3 दूध संकलनास टाळाटाळ केल्यास कारवाई करा : सुनील केदार
Just Now!
X