रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकाला करोनाची लागण झाल्याची माहिती आता समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी या सुरक्षा रक्षकाची कोविड १९ चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा सुरक्षा रक्षक रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता. काही दिवसांपूर्वीच तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना करोना संसर्ग झाला होता. या दोघांची तब्बेत आता बरी असल्याची माहिती मिळते आहे. तर आता रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला करोनाची बाधा झाली आहे.

याआधीही मातोश्री परिसरातल्या काही पोलिसांना करोनाची लागण झाली होती. तर खबरादारीचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून स्वतःच गाडी चालवत असून त्यांनी त्यांच्या कारचालकालाही रजा दिली आहे. नेत्यांच्या सुरक्षेसाठी असलेले जवान आणि पोलिसांना करोना होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथे असलेल्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर गेटवर सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलिसांना करोनाची बाधा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करुन त्यांना १४ दिवस क्वारंटाइनही करण्यात आले होते. तर काही दिवसांपूर्वी तेजस ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांनाही करोनाची लागण झाली होती. या दोन सुरक्षा रक्षकांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांचीही करोनाची चाचणी करण्यात आली होती. आता मिसेस सीएम अर्थात रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकालाही करोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे मातोश्रीवर पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.