सामना हे वृत्तपत्र कधीही वाचत नाही असं सांगणाऱ्यांनी आज सभागृहात सामना दाखवला. याचाच अर्थ सामना हे सामान्य माणसाचं शस्त्र आहे हे सिद्ध झालं आहे. सामना तेव्हाच वाचला असता तर आमच्याशी सामना करण्याची वेळ आली नसती अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. नागपुरातल्या अधिवेशना दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विरोधकांना शिमगा करायचाच असेल तर केंद्र सरकारच्या नावाने करावा राज्य सरकारच्या नावाने करु नये असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

सभागृहात विरोधकांनी गोंधळ घालू नये. विरोधकांनी आज घातलेला गोंधळ हा निंदनीय आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तुम्ही बोंबलून काहीही होणार नाही. बोंबलून प्रश्न मांडल्याने तुमचेच बिंग फुटते आहे असाही टोला उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला. शेतकऱ्यांना मी दिलेलं वचन हे त्यांच्या आणि माझ्यामधलं वचन आहे. शिवरायांच्या आशीर्वादाने मी ते वचन पाळणार आहे. तुम्ही आम्हाला ते करायला लावलं हे कोणालाही भासवू नये असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी आज सभागृहात शेतकऱ्यांना किती मदत दिली ती आकडेवारी सांगितली आहे. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या कोल्हापूरमधल्या भागात जो पूर आला त्यातून सावरण्यासाठी राज्य सरकारने ७ हजार कोटींची मागणी करण्यात आली आहे. इथे अधिवेशनात जे लोक आदळआपट करत आहेत त्यांचेच सरकार केंद्रात आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केंद्राकडून राज्याला निधी मिळावा यासाठी प्रयत्न करावा. ओरडून ओरडून तुमचा घसा खराब झाला असेल तर घसा स्वच्छ करणाऱ्या गोळ्या मी देतो असाही टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला.