|| नीरज राऊत

पालघर जिल्ह्य़ात १५ हजार वाहनांसाठी केवळ तीन सीएनजी पंप :- पालघर जिल्ह्य़ातील ९५ हजार व्यापारी वाहनांपैकी सीएनजी इंधनाचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या १५ हजारांपर्यंत असतानाही संपूर्ण जिल्ह्य़ात सध्या फक्त तीन सीएनजी पंप कार्यरत आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूक व्यवस्थेत असलेल्या रिक्षा व टॅक्सीचालकांना मोठय़ा गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पर्यावरण संवर्धनासाठी सीएनजी इंधनाचा वापर करण्यात शासन प्रोत्साहन व सक्ती करत असताना दुसरीकडे पुरेशा प्रमाणात इंधनपुरवठा करण्याची व्यवस्था नसल्याने वाहनचालकांची कोंडी होत आहे.

पालघर जिल्ह्य़ात व्यापारी तत्त्वावर काम करणारी ९५ हजार वाहने कार्यरत असून त्यापैकी ४८ हजार मालवाहतूक करणारी वाहने, ३२ हजार रिक्षा, आठ हजार मोटार कॅब (टॅक्सी), अडीच हजार मालवाहू तीनचाकी वाहने आणि ३१०० बसगाडय़ांचा समावेश आहे. यांपैकी ६० हजार वाहने डिझेलवर, १९ हजार वाहने पेट्रोलवर तर सुमारे १५ हजार वाहने सीएनजी गॅसवर कार्यरत असल्याचे परिवहन विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार दिसत आहे.

सार्वजनिक व प्रवासी वाहतूक सेवेत असणाऱ्या नव्याने परवाने घेणाऱ्या वाहनांना सीएनजी इंधन वापराने गेल्या काही वर्षांपासून राज्य शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे सार्वजनिक व प्रवासी वाहतूक व्यवस्थेत असलेल्या तीनचाकी व चारचाकी वाहनांना पेट्रोल व सीएनजी या दोन्ही इंधनांवर कार्यरत असलेल्या तीन आसनी रिक्षा आणि इको वाहनांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. सीएनजी हे इंधन किफायशीर पडत असल्याने पूर्वी पेट्रोल-डिझेलवर कार्यरत असलेल्या रिक्षांची संख्या कमी होत आहे. पालघर जिल्ह्य़ात सध्या वसई, बोईसर व वाडाखडकोना या तीन ठिकाणीच सीएनजी इंधन भरण्याची व्यवस्था कार्यरत असून या पंपांवर इंधन भरण्यासाठी वाहनांची मोठी रांग लागलेली असते. नव्याने उभारण्यात येणाऱ्या सीएनजी पंपांना स्थानिक प्राधिकरणाकडून परवानगी घेणे अपेक्षित असून जिल्ह्य़ात काही ठिकाणी अशा पंपांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहेत. असे असले तरी प्रत्यक्ष पंप सुरू होण्यास वेगवेगळ्या अडचणी समोर येत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे शासनाने सीएनजी इंधनाच्या वापर करण्यास सार्वजनिक प्रवासी व्यवस्थेतील वाहनांना सक्तीचे केले असताना पुरेशा प्रमाणात पंपांची उपलब्धता नसल्याने वाहनचालकांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

सीएनजी इंधन हे पर्यावरणपूरक व किफायतशीर असले तरी त्याच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण  झाल्याने अनेक वाहनचालकांना पेट्रोल किंवा डिझेल या इंधनावरच आपली वाहने चालवून उपजीविका करावी लागते.

जिल्ह्यत फक्त दोन सौरवाहने

व्यापारी वाहने म्हणून परवाने घेतलेल्या ९५ हजार वाहनांपैकी जिल्ह्य़ात फक्त दोन वाहने सौर तंत्रज्ञानावर धावत असून त्यामध्ये एक बस आणि एका मालवाहू वाहनाचा समावेश आहे. एकंदर डिझेल इंधनावर हायब्रीड असलेली ४१ मोटारकॅब वाहने कार्यरत असून पेट्रोल हायब्रीड यंत्रणा असलेली एकही व्यापारी वाहन सध्या कार्यरत नाही. १८३ वाहनांमध्ये पेट्रोल व एलपीजी इंधन  वापरण्याची व्यवस्था असून २७ वाहने फक्त एलपीजीवर धावत आहेत. सध्या १२ वाहने विद्युत तंत्रज्ञान प्रकारची असून इतर पद्धतीने कार्यरत असणारी २२० वाहने कार्यरत आहेत.

वाहनचालकांचा ७० किमीचा फेरा

पालघर तालुक्यात ४००हून अधिक सीएनजीवर चालणारी तीनचाकी व चारचाकी वाहने असून या वाहनांना बोईसर किंवा राष्ट्रीय महामार्गावरील वाडाखडकोना येथे इंधन भरण्यासाठी जावे लागत आहे. विशेषत: केळवा, सफाळा व इतर दुर्गम भागातील वाहानांना सीएनजी पंप गाठण्यासाठी ५५ ते ७० किलोमीटरचे अंतर दर दोन दिवसांनी कापावे लागते. सीएनजी इंधन जरी तुलनात्मक स्वस्त असले तरी इंधन भरण्यासाठी मारावी लागणारी फेरी आणि त्यासाठी लागणारा वेळ हे परवडण्यासारखे नसल्याचे केळवा येथील वाहनमालक अशोक किणी यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

सार्वजनिक व प्रवासी वाहतूक व्यवस्थेत नव्याने परवाने देताना वाहनांना सीएनजी इंधनाची व्यवस्था असणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्यामुळे अलीकडच्या काळात सीएनजी इंधनाच्या वाहनांची संख्या वाढली आहे. – अनिल पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, विरार.