नाशिक येथील मुथूट फायनान्सवर दरोडय़ाच्या प्रयत्नास आठवडाही उलटत नाही, तोच जळगावच्या रावेर तालुक्यात निंबोल येथे मंगळवारी विजया बँक शाखेत लुटीचा प्रयत्न झाला. शाखेत दोन पिस्तूलधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात बँकेतील सहव्यवस्थापकाचा मृत्यू झाला. लुटीचा प्रयत्न फसल्यानंतर दोघे फरार झाले.

निंबोलच्या भरवस्तीत विजया बँकेची शाखा आहे. मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास मोटरसायकलीवरून आलेल्या दोन हेल्मेटधारींनी बँकेत प्रवेश करताच सर्वात आधी सहव्यवस्थापक करणसिंह नेगी (३२) यांच्यावर गोळी झाडली. गोळी लागताच नेगी कोसळले. यावेळी शेजारीच बसलेले रोखपाल महेंद्रसिंग राजपूत यांच्यावरही लुटारूंनी पिस्तूल रोखले.

प्रसंगावधान राखून राजपूत हे सायरन वाजविण्यासाठी खाली वाकल्याने त्यांना गोळी लागली नाही. सायरनचा आवाज झाल्यामुळे लुटारू भांबावले. सायरनचा आवाज ऐकून बँकेजवळ उभे असलेले मधुकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भागवत पाटील, पंचायत समिती सदस्य जितेंद्र पाटील तसेच गोपाळ पाटील, वैभव महाजन, विनोद पाटील आदींनी बँकेकडे धाव घेतली. त्यापूर्वीच लुटारू पकडले जाण्याच्या भीतीने मोटरसायकलीवरून पसार झाले.

सहव्यवस्थापक नेगी यांना गंभीर अवस्थेत रावेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

निंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रकाश वानखेडे, ज्ञानेश्वर पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. भरदिवसा झालेला लुटीचा प्रयत्न आणि त्यात बँक कर्मचाऱ्या बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत आहे.

नाशिकच्या मुथूट फायनान्स कार्यालयातही अलीकडे मोटरसायकलवरून आलेल्या चौघांनी भरदिवसा दरोडय़ाचा प्रयत्न केला होता. बँक कर्मचाऱ्याने सायरन वाजविल्याने त्या ठिकाणीही दरोडेखोरांना लूट न करता पळावे लागले. परंतु त्यांनी केलेल्या गोळीबारात सायरनचे बटण दाबणाऱ्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

मुथूट फायनान्स आणि विजया बँकेतील लुटीच्या प्रयत्नात दोन्ही ठिकाणी पिस्तूलचा वापर करण्यात आल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान आहे.