इंडियन बॅडमिंटन लीगमुळे (आयबीएल) भारतातील बॅडमिंटन खेळास व खेळाडूंना ‘अच्छे दिन आयेंगे’ अशी अपेक्षा व्यक्त करतानाच द्रोणाचार्य पुरस्कारविजेते व भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक एस. एम. अरीफ यांनी भारतीय बॅडमिंटन खेळाडूंनी आपल्या क्षमतांचा अधिकाधिक विकास करावा व सातत्याने स्पर्धात्मक सामने खेळून आव्हानांना सामोरे जावे, अशी सूचना केली.
स्व. शांतीकुमार फिरोदिया बॅडमिंटन अकादमीतील खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी अरीफ गेल्या तीन दिवसांपासून येथे आहेत. आज पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही सूचना केली. फिरोदिया अकादमी व अकादमीचे प्रमुख नरेंद्र फिरोदिया स्थानिक बॅडमिंटन खेळाडूंच्या विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. या वेळी अकादमीचे प्रशिक्षक जे. पी. एस. विद्याधर व वेदप्रकाश, जिल्हा संघटनेचे सचिव मिलिंद कुलकर्णी, सदानंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
भारतीय खेळाडूंमध्ये भरपूर ‘टॅलेंट’ आहे. जागतिक खेळाडूंचे आव्हान पेलण्याची क्षमता आहे, परंतु तरीही ते चीन, कोरिया, मलेशिया, इंडोनिशिया येथील खेळाडूंच्या तुलनेत कमी पडतात, कारण भारतीय खेळाडूंकडे शालेय स्तरापासून सरकार लक्ष देत नाही, ते द्यायला हवे. खेळ त्यांच्या करीअरशी निगडित झाला पाहिजे, यासाठी पालकांची भूमिकाही महत्त्वाची ठरते. सरकारने प्रशिक्षण सुविधा व आर्थिक सुरक्षिततेची (नोकरी) हमी द्यायला हवी. आशियाई स्पर्धेतील एक सुवर्णपदकविजेता आजही हातगाडी चालवतो याचेही उदाहरण त्यांनी दिले. देशात खेळासाठी स्वतंत्र मंत्रालय, पूर्णवेळ मंत्री व स्वतंत्र अंदाजपत्रक हवे अशी सूचना करताना त्यांनी आपण मंत्र्यांना खेळाच्या विकासासाठी काही सूचना केल्या होत्या, मात्र त्यावर अंमलबजावणी झाली नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली.
 अकादमीतील खेळाडूंना संधी
फिरोदिया अकादमीतील खेळाडूंना लवकरच राष्ट्रीय पातळीवरील खेळाडूच्या सहवासात सराव करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. फिरोदिया अकादमी व अरीफ यांची हैदराबादमधील अकादमी येथील प्रत्येकी ५ खेळाडू काही दिवसांसाठी परस्परांच्या अकादमीत पाठवले जाणार आहेत. नगरच्या खेळाडूंना हैदराबादमध्ये ज्वाला गुट्टा, तरुण, चेतन आनंद यांसारख्या खेळाडूंचा सहवास मिळेल. तसेच तेथील इतर क्लबमधील खेळाडूंबरोबरही खेळण्याची संधी मिळेल. त्याचा उपयोग नगरच्या खेळाडूंच्या कौशल्यवृद्धीसाठी होईल, असे नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले.