वाघांसाठी प्रसिध्द असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात ‘कोळसा संग्रहालयह्ण तयार करण्याच्या दृष्टीने कोल इंडिया गांभीर्याने विचार करत असून कोल इंडियाचे अध्यक्ष आर.आर. मिश्र यांनी वनखात्याकडे जमिनीची मागणी केली केली आहे. या कोळसा संग्रहालयाच्या माध्यमातून देशविदेशातून येणाऱ्या पर्यटकांना कोळसा व त्यावर आधारी उद्योग, तसेच उपयोगाची माहिती देऊन ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा विचार आहे.
आज ताडोबा कोर व बफरक्षेत्र मिळून १२० वाघांचे अस्तित्व चंद्रपूर जिल्ह्य़ात आहे. त्यामुळे व्याघ्रदर्शनासाठी देशविदेशातील पर्यटकांचा ओढा ताडोबा प्रकल्पाकडे आहे. दर वर्षी या प्रकल्पाला लाखो पर्यटक भेटी देतात. त्यामुळे येथे या पर्यटकांना या परिसरात किमान दोन दिवस राहिला पाहिजे, यासाठी वाघांसोबत अन्य गोष्टींकडे त्यांना आकर्षित करण्याची गरज आहे. दुर्देवाने वनखाते किंवा ताडोबा व्यवस्थापनाकडून ते होतांना दिसत नाही. आज ताडोबातील मोहुर्ली प्रवेशव्दारावर टि-शर्ट व टोपी या दोन गोष्टींशिवाय काहीच मिळत नाही. त्यामुळे पर्यटक येतात आणि निघूनही जातात. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ताडोबात या संग्रहालयाची निर्मिती करण्यासंदर्भात कोल इंडिया गांभीर्याने विचार करत आहे. ‘मेक इन चंद्रपूर’ह्ण कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल इंडियाचे अध्यक्ष आर.आर. मिश्रा यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर कोळसा संग्रहालयाचा प्रस्ताव ठेवला.
या संग्रहालयाबाबत कोल इंडिया अतिशय गंभीर असल्याचे सांगतांनाच हे संग्रहालय तयार करण्यासाठी वनखात्याने जमीन देण्याची मागणी त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. हे कोळसा संग्रहालय देशातील उत्कृष्ट संग्रहालयांपैकी एक असेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या संग्रहालयात कोळशाच्या विविध प्रजातीसोबतच त्यावर आधारित उद्योग, उपयोगिता व कोल इंडिया वेकोलिच्या खाणीतून कशा पध्दतीने कोळसा काढते, याचे संपूर्ण चित्रण राहील. वनखात्याने जमीन दिल्यास हा प्रकल्प मार्गी लागू शकतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, याबाबत वनखाते गांभीर्याने विचार करत आहे.
ताडोबाची जागतिक पातळीवर वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर या सर्व गोष्टी अपेक्षित आहेत. त्यामुळे वनखात्यानेही यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, या जिल्ह्य़ात आज वेकोलिच्या ३२ कोळसा खाणी असून आणखी १६ कोळसा खाणी सुरू होत आहेत. चंद्रपूर देशात वाघ, वीज व कोळशासाठी प्रसिध्द आहे.
या तिन्ही गोष्टी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे पर्यटकांना वाघांसोबतच वीज उत्पादन व कोळशाची माहिती होणे अपेक्षित आहे. ही माहिती व प्रत्यक्ष चित्र या संग्रहालयात दिसून आले तर पर्यटकही खूष होतील, असाही विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला.