17 November 2017

News Flash

कोल वॉशरीजच्या विषारी घटकांचे आरोग्यावर दुष्परिणाम

कोल वॉशरीतील शेवटचे विषाक्त व टाकाऊ घटक आरोग्य आणि पर्यावरणासाठी प्रचंड घातक ठरत असल्याने

विक्रम हरकरे, नागपूर | Updated: January 18, 2013 5:35 AM

कोल वॉशरीतील शेवटचे विषाक्त व टाकाऊ घटक आरोग्य आणि पर्यावरणासाठी प्रचंड घातक ठरत असल्याने याची विल्हेवाट पर्यावरणपूरक शास्त्रीय पद्धतीने लावण्यासाठी संबंधित कोल वॉशरीज प्रकल्पांवर सक्ती करण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयंती नटराजन यांच्यावर पर्यावरणवाद्यांकडून दबाब येऊ लागला आहे.
देशभरातील कोल वॉशरी प्रकल्पातून बाहेर फेकले जाणारे ‘कोल वॉशरी रिजेक्ट’ नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरू लागले आहे. याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची कोणतीही योजना संबंधित प्रकल्पांजवळ नाही. परिणामी, याविरोधात पर्यावरण मंत्रालयाकडे मोठय़ा प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या आहेत. कोळशापासून होणारे प्रदूषण नियंत्रित करण्यात कोल वॉशरीज प्रकल्प अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोळसा जळाल्यानंतर बाहेर फेकल्या जाणाऱ्या अत्यंत घातक अशा राखेपासून पर्यावरणाची हानी होऊ नये, यासाठी राखेचे प्रमाण नियंत्रित करणारा उच्च गुणवत्तेचा कोळसा वापरण्याचे निर्देश औष्णिक विद्युत प्रकल्पांना देण्यात आले आहेत. जळताना मोठय़ा प्रमाणावर राख फेकणारा कोळसा (‘हाय अ‍ॅश कोल’) अत्यंत घातक असे किरणोत्सर्गी उत्सर्जनही करीत असतो, हे आजवरच्या अभ्यासावरून तसेच विविध अहवालांवरून सिद्ध झाले असताना याकडे पर्यावरण मंत्रालय डोळेझाक करीत आहे. कोल वॉशरीजमधून फेकले जाणारे शेवटचे विषाक्त घटक अत्यंत पर्यावरणपूरक अशा शास्त्रीय पद्धतीने नष्ट करण्याशिवाय पर्याय नाही. त्याची विल्हेवाट लावणे आता अपरिहार्य झाले आहे.
नैसर्गिक संसाधनांच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालयानेही काही महत्त्वाचे निर्णय दिलेले आहेत. संसदेतही या मुद्दय़ावर आवाज उठवण्यात आल्यानंतर लोकांचे आरोग्य सर्वोच्च स्थानी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून कोळशाची तीव्र टंचाई भासत असून ऊर्जा प्रकल्पांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. या प्रकल्पांचे सरकारी कंपन्यांचा कोळसा सबसिडी दराने खरेदी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घडामोडी अत्यंत वेगाने घडत असून पर्यावरण, निसर्ग आणि मनुष्यासाठी हानिकारक ठरणाऱ्या ‘कोल वॉशरीज रिजेक्ट’वर मात्र कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. पर्यावरण संरक्षण कायदा- १९८६ मध्ये घातक पदार्थाची व्याख्या अत्यंत स्पष्टपणे नमूद करण्यात आली आहे. राख उत्सर्जन अधिक प्रमाणात करणारा कमी प्रतीचा कोळसा वापरण्यावर बंदी असूनही त्याचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जात असल्याने विषारी धातू, शिसे, सेलेनियम आणि क्रोमियम उत्सर्जित होत असल्याने कर्करोग, मेंदूचे विकार, गर्भवती महिलांच्या गर्भावर विपरीत परिणाम, प्रजनन अक्षमता, अस्थमा आणि अन्य आजारांची लागण माणसांना होत आहे. विशेषत: लहान मुलांच्या अवयवांवर यामुळे होणारे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. राखेमुळे वनस्पती आणि मोठे वृक्ष नष्ट होत असल्याने प्रदूषणही वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी पर्यावरणवाद्यांनी जयंती नटराजन यांच्याकडे साकडे घातले आहे.

First Published on January 18, 2013 5:35 am

Web Title: coal washries dangourous for health
टॅग Environment,Health