न्यू नागझिऱ्याला लागून असलेले कोका वन्यजीव अभयारण्य पर्यटकांसाठी खुले होऊन अवघ्या चार दिवसांचा कालावधी लोटत नाही तोच, पर्यटकांचा ओघ या अभयारण्याकडे वाढीस लागला आहे. रविवारी, ४ मे रोजी या अभयारण्यात वन्यजीव आणि निसर्ग पर्यटनासाठी तब्बल १५ वाहनांचा प्रवेश झाल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर. कुंभारे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. कोका वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित होण्याच्या कित्येक वष्रे आधीपासून या परिसरात वन्यजीव अभयारण्याचा अधिवास आहे. सात-आठ दशकेआधीपासून या परिसरात वाघांसह इतरही वन्यजीवांचा अधिवास असल्याची नोंद आहे. ब्रिटिश काळात कोका व नागझिरा हे ‘हंटिंग झोन’ होते. बरेच वर्षांंपासून या परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यात यावा ही मागणी होती. १८ जुलै २०१३ ला कोका हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित झाले. आजही या परिसरात सुमारे ५० अस्वल असल्याचे सांगितले जाते. पर्यटकांना एकाचवेळी पाच-सहा अस्वल हमखास दर्शन देतात. याशिवाय बिबटय़ाचेसुद्धा दर्शन झाले आहे. कोका अभयारण्यात दोन-तीन वाघांचा अधिवास निश्चितच आहे, याशिवाय न्यू नागझिरा लागून असल्यामुळे या दोन्ही  अभयारण्यात तेथील वाघाच्या कुटुंबाचा संचार असतो.
त्यामुळे पर्यटकांना हमखास व्याघ्र दर्शन होते. वन्यजीवांच्या अधिवासासोबतच कोकाचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करणारे आहे. तलाव आणि नैसर्गिक पाणवठय़ांची या परिसराला देण आहे. राजडोह, पाझर तलाव, अजनी रिठी, अजनी हमेशा, आमगाव, उसगाव, सोनकुंड यासारख्या मोठय़ा तलावांचा समावेश कोका वन्यजीव अभयारण्यात आहे. एवढेच नव्हे तर नागझिरा आणि न्यू नागझिराहून अधिक चांगले निसर्गसौंदर्य आहे. तब्बल १०० चौरस किलोमीटरचा हा परिसर म्हणजे पर्यटकांसाठी चांगली पर्यटन मेजवानी आहे. कोका वन्यजीव अभयारण्यात प्रवेशासाठी सध्या चंद्रपूर कॉलनी हा एकच मार्ग आहे. भंडाऱ्यावरुन २० किलोमीटरवर पलाडी फाटा आणि पलाडी फाटय़ावरून १२ किलोमीटरवरून या अभयारण्यात प्रवेश करता येतो. भविष्यात सोनेगाव व कोका येथून प्रवेशाचा मार्ग खुला करून दिल्या जाईल. पर्यटनासाठी आवश्यक असणाऱ्या हॉटेल, रिसॉर्ट आणि जिप्सी यासारख्या सोयी या अभयारण्यात अजून उपलब्ध व्हायच्या आहेत. मात्र, त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आला असून, लवकरच या ठिकाणी या सर्व सोयीसुविधा पर्यटकांसाठी उभारल्या जातील, असे कुंभारे म्हणाले. सद्यस्थितीत पर्यटकांना त्यांच्याच वाहनाने या अभयारण्यात प्रवेश देण्यात येत आहे, पण गाईडसोबत घेण्याची अट कायम आहे. सकाळी ६.३० ते १०.३० या वेळात सात वाहने आणि दुपारी २.३० ते सायंकाळी ६.३० या वेळात सात वाहनांना प्रवेश दिला जात आहे. नेमक्या चार दिवसांच्या सुटय़ा सुरू होण्यापूर्वी पर्यटकांसाठी हे अभयारण्य खुले करण्यात आल्यामुळे, पर्यटकांनीसुद्धा तेवढाच प्रतिसाद दिला आहे.

कोका वन्यजीव अभयारण्यात वन्यजीवांची भरपूर रेलचेल असली तरीही साकोली-तुमसर हा राष्ट्रीय महामार्ग मात्र त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरू पाहात आहे. सोनेगाव-कोका हा आठ किलोमीटरचा अभयारण्याच्या आत असून या मार्गावरून नेहमीच जड वाहनांची वाहतूक होत असते. दरम्यानच्या काळात या राष्ट्रीय महामार्गावर चार वाघांनी ठाण मांडले. दोन्हीकडून वाहने असल्यामुळे त्यांना रस्ता पार करणे कठीण झाले होते. अखेरीस काही वन्यजीवप्रेमींनी दोन्हीकडून होणारी वाहतूक रोखून धरली आणि वाघांनी त्यांच्या अधिवासात प्रवेश केला. ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून त्यावर तोडगा काढण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.