केंद्रीय नारळ विकास बोर्डाच्या वतीने नारळ समूह गटाला प्रति झाड देण्यात येणाऱ्या शंभर रुपयांच्या खतात वाढ करून प्रति नारळ झाड दोनशे रुपये करावे आणि या नारळाच्या झाडांना सेंद्रीय खतेच शेतकऱ्यांना वाटप करण्याचा ठराव कार्यशाळेत घेण्यात आला, तसेच कृषी उत्पादनातील नीरा व काजू बोंडू दारू करातून मुक्त करण्यात यावी, अशी मागणीही शासनाकडे करण्याचे ठरले. क्वॉयर बोर्ड, जिल्हा श्रीफळ उत्पादन संघ आणि सिंधुदुर्ग ऑरगॅनिक फेडरेशन यांच्या वतीने आयोजित कार्यशाळेचा शुभारंभ माजी आमदार पुष्पसेन सावंत यांच्या हस्ते झाला. या वेळी सिंधुदुर्ग ऑरगॅनिकचे अध्यक्ष बाळासाहेब परुळेकर, उद्योजक कलमानी, श्रीफळ संघाचे सुरेश गवस, रामानंद शिरोडकर, क्वॉयर बोर्डाचे व्यवस्थापक पांडुरंग तोडकर, नारळ विकास बोर्डाचे आगलावे, प्रा. विजय जाधव, अनिल मोरजकर, रमाकांत मल्हार आदी उपस्थित होते.
श्रीफळ उत्पादक संघाचे अध्यक्ष सुरेश गवस यांनी नारळ विकास बोर्डाने यापुढे नारळ बागायतदारांना सेंद्रीय खत द्यावे, वाढ करावी व नीराच्या परवानगीतून दारू बंदी खात्याला वगळण्याची मागणी केली. याला उपस्थितांनी ठरावाच्या रूपात अनुमोदन दिले. काथ्या उद्योगावर शासनाचे नियंत्रण ठेवतानाच काथ्याला हमी भाव द्यावा, तसेच या उद्योगात येणाऱ्यांसाठी मार्केटिंग दालन शासनाने खुले करावे. कोकणात काथ्या उद्योगाला चांगले दिवस येणार असल्याने हमी भाव, मार्केटिंग व स्थानिक उद्योजकांना मार्गदर्शन गरजेचे आहे, असे उद्योजक शंकर कलमानी यांनी सांगून क्वॉयर बोर्डाचे बजेट शंभर कोटींवरून पाचशे कोटींपर्यंत नेण्याची मागणी केली. या वेळी सिंधुदुर्ग ऑरगॅनिक फेडरेशनचे अध्यक्ष बाळासाहेब परुळेकर म्हणाले की, आज प्रत्येक घर दवाखाना बनला आहे. आंबा, काजू, भातशेती अशा कृषी उत्पादनावर कीटकनाशके फवारणी व रासायनिक खतामुळे चाक बदलून गेले आहे. त्यासाठी सर्वानी संघटित होऊन सेंद्रीय खते शेतीला प्राधान्य द्या. नारळही सेंद्रीयच आहे. त्यामुळे पुढील काळात सुरक्षित अन्न देण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करू या. गोआधारित शेतीचे प्रयोग करून कृषीविकास घडविण्यासाठी सर्वानीच संघटितपणे प्रयत्न करू या, असे परुळेकर म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील शेतकरी संघटित व्हावे आणि त्यांनी हक्कासाठी भांडावे, असे मला लहानपणापासून वाटत होते, पण जातीपातीवाले किंवा अन्य संघटना झाल्या; पण शेतकरी हक्कासाठी संघटित होऊन भांडला नाही. आजच्या जिल्ह्य़ातील एकाही लोकप्रतिनिधींना शेतीची जाणीव नाही. त्यांनी कधी शेती केली नाही, असे पुष्पसेन सावंत म्हणाले. सेंद्रीय खते शेती करून प्रदूषणकारी शेतीला सर्वानीच नाकारावे. त्यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे झटण्याचे आवाहन पुष्पसेन सावंत यांनी केले. या वेळी प्रा. विजय जाधव यांनी पर्यावरणीय धोके कथन केले, तर क्वॉयर बोर्डाच्या योजना पांडुरंग तोडकर व नारळ विकास बोर्डाच्या योजना आगलावे यांनी सांगितल्या. रामानंद शिरोडकर व सुरेश गवस यांनी नारळ समूह गटाच्या विकासाची कल्पना मांडली. अनिल मोरजकर यांनी अग्नीहोत्राचे महत्त्व विशद केले. रमाकांत मल्हार यांनी सूत्रसंचालन केले.