आचारसंहितेचा भंग केल्याच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका उपअभियंत्याला सोमवारी निलंबित करण्यात आले. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे दाखल करण्यात आलेल्या खुलासा असमाधानकारक असल्याची शिफारस आल्यानंतर बांधकाम विभागाने निलंबनाची कारवाई केली.
सांगली येथील माधवनगर रस्त्यावर असणाऱ्या विश्रामधामवरील नामफलक आचारसंहितेच्या कालावधीत झाकला नसल्याच्या कारणावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाचे उपअभियंता पी. एच. मोहिते यांना नोटीस बजावली होती. या नोटीसला त्यांच्याकडून प्राप्त झालेला खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आयोगाकडे धाडला होता.
घडलेली घटना आणि याबाबतचा प्राप्त खुलासा लक्षात घेऊन आयोगाने उपअभियंता मोहिते यांना क्लीनचीट दिलेली नव्हती. त्यामुळे बांधकाम विभागाच्या सचिवांनी श्री. मोहिते यांच्यावर सोमवारी निलंबनाची कारवाई केली. या संदर्भात बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम. बी. वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असला, तरी या संदर्भात अद्याप लेखी माहिती उपलब्ध झाली नसल्याचे सांगितले.