लॉकडाउनमुळे मागील दहा दिवसांपासून आपल्या आठ महिन्यांच्या मुलीसह उस्मानाबाद शहरातील बसस्थानकात अडकून पडलेल्या कविताला आता कायमचा निवारा लाभणार आहे. लोकसत्ताने तिची आर्त हाक प्रकाशित केल्यानंतर राज्यभरातून अनेकांनी तिच्या मदतीसाठी विचारणा केली. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ आणि जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांनी तत्परतेने एका आश्रमशाळेत तिची तात्पुरती व्यवस्था केली. अहमदनगर येथील माऊली प्रतिष्ठानने त्या दोघींचा कायमस्वरूपी सांभाळ करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी अनुमती दिली आहे, त्यामुळे गतिमंद कविता आणि निरागस महकला आता हाक्काचा निवारा लाभणार आहे.

लॉकडाउनमुळे सगळी वाहतूक ठप्प झाली आणि नेमकं त्याचवेळी उस्मानाबाद शहरातील बस स्थानकात कविता आणि तिची लहान मुलगी अडकून पडल्या. ओस पडलेल्या बसस्थानकात दहा दिवसांपासून अडकून पडलेली कविता प्रत्येकाला गाडी कधी सुरू होणार आहे हो? असा एकच प्रश्न विचारत होती. तिच्या मनातली ही आर्त भावना लोकसत्ताने सर्वांसमोर मांडली. राज्यभरातून अनेक सजग नागरिकांनी तिच्या मदतीसाठी विचारणा करण्यास सुरुवात केली. सोलापूर येथील समीर गायकवाड यांनी या वृत्ताच्या आधारे समाजमाध्यमातून दोघींना मदत करण्याचे आवाहन केले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, अकोला, नागपूर अशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मदतीसाठी अनेकांनी पुढाकार घेतला.

अहमदनगर येथील माऊली प्रतिष्ठानचे राजेंद्र धामणे यांनी लोकसत्ताशी संपर्क साधून या दोघींची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दर्शवली. ही बाब जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांच्या यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कविता आणि महकला नगर येथील माऊली प्रतिष्ठानच्या ताब्यात देण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. अनेक दिवसांपासून आपल्या आठ महिन्याच्या चिमुकलीसह उघडयावर राहणाऱ्या कविताला आता हक्काचे छत लाभणार आहे.

“समाजमाध्यमातून हे वृत्त वाचले. त्यानंतर तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक माया दामोदरे यांच्यासह पथकाला पाठवून त्यांची सुरक्षित ठिकाणी रवानगी केली” अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रोशन यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वृत्त वाचून राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांना या दोघींना सर्वोतोपरी मदत करण्यास सांगितले असल्याचे सक्षणा सलगर यांनी सांगितले. लॉकडाउनच्या कालावधीत कविता आणि तिच्या मुलीची काळजी शहरातील अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारली होती. हे वृत्त प्रकाशित होताच अनेकांनी मागील काही दिवसांपासून आम्ही तिची काळजी घेत असल्याचे सांगितले. तसेच तिला हक्काचा निवारा लाभणार असल्यामुळे आनंदही व्यक्त केला.

अधिकृत परवानगी दिली आहे – जिल्हाधिकारी

बातमी प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी या दोघींबाबत विचारणा केली. वेळेचे गांभीर्य ध्यानात घेऊन लगेच त्यांच्या निवासाची तात्पुरती व्यवस्था केली. अहमदनगर येथील शासनमान्य असलेल्या माऊली प्रतिष्ठानने या दोघींची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून या निराधार माय लेकीला त्यांच्याकडे सुपूर्द करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. लोकसत्तेच्या वृत्तामुळे त्या दोघींची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करता आल्याचेही जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी सांगितले.