लोकसत्ता, खास प्रतिनिधी
अलिबाग- मराठा आरमाराचे मुख्यालय असलेल्या कुलाबा किल्ल्याची पडझड होत आहे. किल्ल्याच्या संवर्धनाचे काम तातडीने सुरु करण्यात यावे त्यासाठी निधीची कमतरता असेल तर तो राज्य सरकारकडून उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्या कुलाबा किल्ल्याच्या पहाणीनंतर पत्रकारांशी बोलत होत्या.

कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचे मुख्यालय असणाऱ्या ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याची सध्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. समुद्राच्या लाटांमुळे किल्ल्याची तटबंदी ढासळते आहे. किल्ल्यात सर्वत्र झुडपे पसरली आहे. किल्लातील पोखरणीतील पाणी शेवाळ परसरल्याने दुषित झाले आहे. गणेश मंदिरासमोरील दिपस्तंभ पडण्याची शक्यता आहे. किल्ल्यावरील जुन्या तोफांची दुरवस्था होते आहे. त्यामुळे किल्ल्याची तातडीने देखभाल दुरुस्तीचे काम सुरु करण्यात यावे अशी मागणी शिवप्रेमी संघटना आणि अलिबागकरांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी किल्ल्याची पहाणी केली. यावेळी खासदार सुनील तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, आणि पुरातत्व विभागाचे अधिकारी रुघुवेंद्र यादव उपस्थित होते.

किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम तातडीने सुरु करावे अशा सुचना त्यांनी यावेळी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. किल्ला संवर्धनासाठीचा बृहद आराखडा तयार करून तो केंद्र सरकारकडे पाठविला जावा, त्यासाठी राज्यसरकारच्या वतीने जी काही मदत लागेल ती दिली जाईल, निधीची कमतरता असल्यास तो राज्यसरकारकडून उपलब्ध करून देता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. किल्ल्यात दरवर्षी माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवासाठी लाखो भाविक किल्ल्यात येतात त्यामुळे पुरातत्व विभाग भाविकांकडून प्रवेश शुल्क आकारत असते. या दिवशी भाविकांकडून प्रवेश शुल्क आकरण्यात येऊ नये अशी सूचना त्यांनी केली.

अलिबाग मधील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची किल्ल्यात गाइड म्हणून नियुक्ती करण्यात यावी. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था राज्य सरकारच्या पर्यटन विभागा मार्फत करता येऊ शकेल. त्यामुळे किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना किल्ल्याची माहितीही मिळेल आणि स्थानिकांना रोजगार संधी उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगीतले. किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी ४६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून संरक्षक भिंतीच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरु होईल अशी माहिती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

कुलाबा किल्ला हा देशाचे वैभव आहे. त्याची देखभाल आणि दुरुस्ती करणे हे केंद्र सरकारची जबाबदारी आहे. रायगड किल्ल्याप्रमाणे कुलाबा किल्ल्याचे संवर्धन झाले पाहिजे. यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्र्याकडे पाठपुरावा केला जाईल असे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.